05 October, 2026

वीज वितरण व्यवस्था सुरळीत ठेवा -जिल्हाधिकारी राहुल गुप्ता ▶️फिडर, ट्रान्सफॉर्मर व विद्युत उपकरणांची तातडीने तपासणी करण्याचे निर्देश



हिंगोली, दि. ५ (जिमाका) : खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था सुरळीत आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महावितरणला दिले आहेत. 


दुष्काळाच्या काळात वीजपुरवठा ही अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे वीज वितरण व्यवस्थेतील कोणत्याही कामात विलंब होऊ नये आणि वीजपुरवठा सुरळीत, अखंडित व कार्यक्षम राहील, याची दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी स्पष्ट करत यासंदर्भात त्यांनी महावितरणला सूचना दिल्या आहेत.


खरीप हंगाम २०२६ मध्ये ‘ट्रिगर-१’ (प्रथम कळ) लागू झालेल्या तालुक्यांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि वसमत या पाचही तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी, सिंचन, पशुधनासाठी पाणी तसेच अन्य अत्यावश्यक सेवांसाठी वीजपुरवठ्याची गरज वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज वितरण यंत्रणा सक्षम ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिल्या आहेत.


जिल्ह्यातील सर्व फिडर, ट्रान्सफॉर्मर, डिस्ट्रीब्युशन बॉक्स आणि संबंधित विद्युत उपकरणांची तातडीने तपासणी करावी. आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करावी. फिडरमधील सॅग, लूज कनेक्शन, जॉइंट, टर्मिनल, फ्यूज आणि ब्रेकरची तपासणी करून आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.


दीर्घकाळापासून वापरात असलेले किंवा खराब झालेले विद्युत साहित्य तपासून आवश्यकतेनुसार दुरुस्ती अथवा नवीन साहित्याने बदलावे. विशेषतः ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व पिण्याच्या पाण्याच्या सुविधांना वीजपुरवठा करणाऱ्या फिडर व ट्रान्सफॉर्मरची प्रतिबंधात्मक तपासणी करून त्यांची कार्यक्षमता सुनिश्चित करावी.

ओव्हरलोडिंग, कमी दाब, वारंवार होणारे फॉल्ट आणि वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर व अन्य विद्युत उपकरणांमुळे वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी आवश्यक राखीव साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे.


दुष्काळाच्या कालावधीत विद्युत बिघाड झाल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी विशेष पथके व आपत्कालीन दुरुस्ती यंत्रणा कार्यान्वित ठेवावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. दुरुस्ती करताना तात्पुरत्या उपायांऐवजी भविष्यात वारंवार बिघाड होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना आहेत.


दुरुस्ती व देखभाल केलेल्या फिडर, ट्रान्सफॉर्मर आणि डिस्ट्रीब्युशन पॉईंटची नोंद ठेवावी. कामाच्या गुणवत्तेची सक्षम अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घ्यावी. करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी महावितरणला दिले आहेत.

**

No comments: