06 October, 2026

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी -पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी 
-पालकमंत्री नरहरी झिरवाळ

▶️ फटाका दुर्घटनेची सखोल चौकशी करा; दोषींवर कठोर कारवाई करा

▶️ दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांप्रती पालकमंत्री झिरवाळ यांनी व्यक्त केल्या मनःपूर्वक संवेदना


हिंगोली, दि. ६ ऑक्टोबर (जिमाका) : हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने आवश्यक ते सर्वोत्तम उपचार मिळावेत, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.

या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांप्रती पालकमंत्री झिरवाळ यांनी मनःपूर्वक संवेदना व्यक्त केली.

नियमांनुसार फटाक्यांची साठवणूक, आवश्यक परवानग्या  आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन आदी बाबींची सखोल चौकशी करण्याचे निर्देश हिंगोली जिल्हाधिकारी यांना पालकमंत्री झिरवाळ यांनी दिले आहेत. चौकशीत नियमांचे उल्लंघन किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देशही पालकमंत्री झिरवाळ यांनी दिले आहेत. 

तसेच जिल्ह्यातील सर्व फटाका विक्री व साठवणूक केंद्रांची तातडीने तपासणी करावी. या ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याची खात्री करावी, अशा सूचनाही पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

No comments: