06 October, 2026

औंढा नागनाथ मंदिरातील विकासकामांची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केली पाहणी.

औंढा नागनाथ मंदिरातील विकासकामांची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केली पाहणी.
कामे सुरक्षितता व गुणवत्तेच्या निकषांनुसार वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना

हिंगोली, दि. 6 (जिमाका) : औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ मंदिराच्या आतील गर्भगृहातील दुरुस्तीचे काम सहायक संचालक, पुरातत्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मंदिर परिसरात भाविक व पर्यटकांची मोठी वर्दळ लक्षात घेता दुरुस्तीचे काम सुरक्षितपणे व सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी मंदिर दि. ५ ऑक्टोबरपासून एक महिन्याच्या कालावधीसाठी भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

या सुरू असलेल्या दुरुस्ती व विकास कामांची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी मंदिराच्या आतील गर्भगृहातील कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. दुरुस्तीची कामे पुरातत्वीय वास्तूचे महत्त्व व मूळ स्वरूप अबाधित ठेवून, सुरक्षितता आणि गुणवत्तेच्या निकषांनुसार पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

कामाच्या कालावधीत आवश्यक त्या सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासह भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिले. तसेच कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी तहसीलदार हरीश गाडे, हिंगोली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश जोशी, सार्वजनिक बांधकाम विभाग, औंढा येथील उपअभियंता वसंत मुळे, पुरातत्व विभागाचे अभियंता तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments: