06 October, 2026

हिंगोलीत १ हजार ३९० किलो फटाक्यांचा साठा जप्त- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोलीत १ हजार ३९० किलो फटाक्यांचा साठा जप्त
- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता 
संबंधीत चार जणांवर होणार गुन्हे दाखल 
जप्त साठा नष्ट करण्याचे जिल्हाधिकांऱ्याचे निर्देश

हिंगोली, दि. ६ (जिमाका) : हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग ही अत्यंत दुर्दैवी व गंभीर घटना आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील फटाका विक्री व साठवणुकीच्या ठिकाणांची सुरक्षिततेच्या दृष्टीने काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत आतापर्यंत चार जणांकडून एकूण १ हजार ३९० किलो फटाक्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. संबंधित चार जणांविरुद्ध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. जप्त करण्यात आलेला फटाक्यांचा साठा नियमानुसार नष्ट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हिंगोली येथे काल मारवाडी गल्ली परिसरात घडलेल्या दुर्घटनेतील जखमींना तातडीने आवश्यक व सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत असून, चौकशीत दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.

दिवाळी उत्सवाच्या कालावधीत नागरिकांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्याने राखावी. फटाका विक्री व साठवणुकीसंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन होत असल्याबाबतची तपासणी संबंधित विभागांनील करावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद मिळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत.
00000

No comments: