06 October, 2026

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व ‘अक्षर आनंद’ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी अभिजात भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व ‘अक्षर आनंद’ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी अभिजात भाषा सप्ताह उत्साहात संपन्न
*मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी पालकांनी घरात वाचनस्नेही वातावरण तयार करावे : प्रा. डॉ. दत्ता सावंत*
*विद्यार्थी व पालकांनी घेतला सलग अर्धा तास सामूहिक पुस्तक वाचनाचा अनोखा आनंद*
  
हिंगोली, दि. 6 (जिमाका) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा बहुमान मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान ‘मराठी अभिजात भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि रामकृष्ण सिटी, हिंगोली येथील ‘अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात विविध वाचनप्रेरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

लहान मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजावी यासाठी रामकृष्ण सिटी, हिंगोली येथील ‘अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्र’ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांतर्गत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी जिल्हा ग्रंथालयास भेट देऊन संपूर्ण ग्रंथालय परिसराची व समृद्ध पुस्तकसंग्रहाची सविस्तर माहिती जाणून घेतली. याप्रसंगी प्रा. डॉ. दत्ता सावंत, शकुंतला सावंत, डॉ. धनाजी पाटील, राणी पाटील, डॉ. भगवान घुटे, स्नेहल घुटे, डॉ. राजेश गोरे, सोनाली गोरे, मनीषा नाईक यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना, "मुलांमध्ये वाचनाची खरी आवड निर्माण करायची असेल, तर केवळ उपदेश न करता पालकांनी स्वतः वाचनाची सवय अंगीकारून घरात वाचनस्नेही वातावरण निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे," असे प्रतिपादन प्रा. डॉ. दत्ता सावंत यांनी केले.

कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी वाचनालयाचे महत्त्व, दैनंदिन जीवनातील वाचनाचे फायदे, एकाग्रतेने वाचन करण्याची पद्धत, योग्य पुस्तक कसे निवडावे व पुस्तकांची निगा कशी राखावी, याविषयी सविस्तर संवाद साधला. मराठी भाषेचा गौरवशाली वारसा नव्या पिढीने पुढे न्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या संयुक्त उपक्रमांतर्गत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी ग्रंथालयात एकाग्रतेने सलग अर्धा तास दर्जेदार बालसाहित्याचे व पुस्तकांचे सामूहिक वाचन केले. शासकीय ग्रंथालयातील समृद्ध ग्रंथसंपदा पाहून विद्यार्थी व पालक भारावून गेले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘अक्षर आनंद’ समूहातील सर्व पालक, सदस्य तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. बालवयातच वाचन संस्कृतीची पाळेमुळे घट्ट करणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
00000

No comments: