05 October, 2026

सेवा संकल्प अभियानांतर्गत शासकीय जिल्हा ग्रंथालय येथे व्यसनमुक्ती व मानसिक आरोग्य प्रबोधन शिबिर संपन्न








हिंगोली दि.५ ऑक्टोबर:-शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हिंगोली आणि शासकीय जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियाना’तंर्गत जिल्हा ग्रंथालय कार्यालयात व्यसनमुक्ती जनजागृती व प्रबोधन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात उपस्थित विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याबाबत तसेच मानसिक आरोग्यासाठी वाचनाचे महत्त्व या विषयावर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. गजानन कुरुडे, डॉ. अभिजीत सोनटक्के, कार्यालय अधीक्षक सदाशिव तनपुरे, अंजली वाघमारे, चंद्रपूजा बांदरे व त्यांची संपूर्ण वैद्यकीय चमू उपस्थित होती. तसेच शासकीय जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांची प्रमुख उपस्थिती होती.


याप्रसंगी मार्गदर्शन करताना वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यसनांचे शरीरावर आणि मेंदूवर होणारे घातक परिणाम विशद केले. "तरुणाईने कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहून स्वतःच्या प्रगतीसह समाजाच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे," असा संदेश डॉ. कुरुडे , डॉ. सोनटक्के व संपूर्ण वैद्यकीय चमू यांनी दिला. 


व्यसनाधीनतेपासून परावृत्त होण्यासाठी मानसिक कणखरता कशी निर्माण करावी, याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.


कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. "वाचनामुळे माणसाचे विचार सकारात्मक बनतात आणि मानसिक ताणतणाव दूर होण्यास मोठी मदत होते. मानसिक आरोग्यासाठी आणि जीवनात प्रगती करण्यासाठी पुस्तकांची मैत्री आवश्यक आहे," असे प्रतिपादन त्यांनी केले. 


वाचनामुळे बौद्धिक विकासासोबतच व्यसनासारख्या वाईट प्रवृत्तींपासून परावृत्त होण्यासाठी योग्य दिशा मिळते, यावर त्यांनी भर दिला.


विद्यार्थ्यांशी थेट संवाद व शंकांचे निरसन:

या शिबिरात मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी थेट व मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थ्यांचे व्यसन, मानसिक ताण आणि जीवनशैली संदर्भातील विविध समज-गैरसमज दूर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मांडलेले विचार व अडचणी लक्षपूर्वक ऐकून घेत त्यांच्या प्रत्येक शंकेचे व प्रश्नांचे समाधानकारक निरसन करण्यात आले.


कार्यक्रमाला ग्रंथालयातील अभ्यासक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या शेवटी उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

No comments: