▶️11 ते 18 नोव्हेंबरदरम्यान विविध उपक्रम; आरोग्य शिबिर, प्रमाणपत्र व धनादेशांचे वाटप
हिंगोली, दि. 6 नोव्हेंबर (जिमाका) : आदिवासी समाजाचा गौरव, हक्कांविषयी जनजागृती, विविध शासकीय योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत हिंगोली जिल्ह्यात 11 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन कळमनुरीतील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्यावतीने करण्यात आल्याचे एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. सुनील बारसे यांनी सांगितले.
*पत्रकार परिषद, स्मारक स्वच्छता व लाभार्थ्यांना धनादेश वाटप*
सप्ताहांतर्गत 12 नोव्हेंबर रोजी कळमनुरी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. 13 नोव्हेंबर रोजी महिला बचत गटांना तसेच न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना धनादेशांचे वाटप करण्यात येईल. 14 नोव्हेंबर रोजी भुरक्याचीवाडी व काळ्याचीवाडी (ता. कळमनुरी) येथील आदिवासी स्मारकांची स्वच्छता करून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील दरेगाव येथे पोलीस भरतीच्या अनुषंगाने लेखी परीक्षा व मैदानी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.
*भगवान बिरसा मुंडा जयंतीचा मुख्य सोहळा*
भगवान बिरसा मुंडा यांची जयंती 15 नोव्हेंबर रोजी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त प्रभातफेरी, भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर व्याख्यान, पारंपरिक ढोल व नृत्यांसह सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आदिवासी बांधवांच्या पारंपरिक वाद्यांसह भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. याच दिवशी हिंगोली येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृह क्रमांक 1 चे ऑनलाइन स्वरूपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे नियोजित आहे.
*जात प्रमाणपत्र, वनहक्क लाभांचे वितरण; आरोग्य तपासणी शिबिर*
अनुसूचित जमातीतील नागरिकांना कळमनुरीतील प्रकल्प कार्यालयात 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच वनहक्क पट्टेधारकांना विविध शासकीय योजनांचे लाभ वितरित करण्यात येतील. आरोग्य विभागाच्या सहकार्याने आरोग्य व पोषणविषयक जनजागृती आणि आरोग्य तपासणी शिबिर 17 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. कळमनुरी तालुक्यातील बोल्डावाडी (ता. कळमनुरी) येथे 18 नोव्हेंबर रोजी पात्र लाभार्थ्यांना कृषी, पशुसंवर्धन व कौशल्य विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही श्री. बारसे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment