30 May, 2025

महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजनेद्वारे मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी

हिंगोली (जिमाका), दि. 30 : मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत पुरवणारी महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून प्रभावीपणे राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. ही योजना मराठा-कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणारी ठरेल. अर्ज प्रकिया आणि मदत : इच्छूक विद्यार्थ्यांनी सारथीच्या www.fs.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर विहित नमुन्यात दि. 16 जून, 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी स्प्रिंग-2025 (एप्रिल/मे 2025), फाल-2025 (जुलै/ऑगस्ट/सप्टेंबर 2025) आणि स्प्रिंग-2026 (जानेवारी ते मार्च 2026) या कालावधीत प्रवेश घेणारे विद्यार्थी अर्ज करुन शकतात. योजनेचा उद्देश आणि व्याप्ती : ही योजना मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पीएडी क्यूएस वर्ल्ड युनिवर्सिटी रँकींग मध्ये 200 च्या असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. यामध्ये 50 जागा पदव्युत्तर पदवी, पदविका आणि 25 जागा पीएचडीच्या विविध अभ्यासक्रमासाठी राखीव आहेत. शिष्यवृत्तीचे स्वरुप : योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता आणि वैयक्तीक आरोग्य विमा यासाठी आर्थिक सहाय्य मिळते. प्रती वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल 30 लाख रुपये आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी कमाल 40 लाख रुपये या मर्यादेत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. पात्रता निकष : नागरिकत्व आणि रहिवास लाभार्थी हा मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीतील महाराष्ट्राचा रहिवासी आणि भारतीय नागरिक असावा. शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 55 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असावी. वयोमर्यादा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल वय 35 वर्षे आणि पीएचडीसाठी 40 वर्षे आहे. उत्पन्न मर्यादा-कुटुंबाचे मागील आर्थिक वर्षातील सर्व मार्गांनी प्राप्त एकूण वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. विद्यापीठ प्रवेश पात्रता क्यूएस वर्ल्ड युनिवर्सिटी रँकीग 200 च्या आत असलेल्या परदेशी विद्यापीठात पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी अनकंडिशनल ऑफर लेटर असणे आवश्यक आहे. यापूर्वी कोणतीही राज्य किंवा केंद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. अर्धवेळ किंवा एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थी पात्र ठरणार नाहीत. आवश्यक कागदपत्रे : विहित नमुन्यातील अर्ज, सक्षम प्राधिकाऱ्याचा उत्पन्नाचा दाखला आणि आयटीआर (एवाय-2025-26) फॉर्म क्र. 16, दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर पदवीच्या गुणपत्रिका, इतर आवश्यक दाखले, परदेशी विद्यापीठाचे अनकंडीशनल ऑफर लेटर, विद्यापीठाच्या प्रोस्पेक्ट्सची प्रत, अद्यावत क्यूएस वर्ल्ड युनिवर्सिटी रँकींगची माहिती आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्रासाठी प्रगती अहवाल आणि खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्रे सादर केल्यास फौजदारी कारवाई आणि खर्चाची व्याजासह वसुली केली जाईल. अधिक माहितीसाठी सारथीच्या विभागीय कार्यालयाशी (संपर्क क्रमांक 020-25592507) संपर्क साधावा किंवा सारथीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन उपव्यवस्थापकीय संचालक, सारथी, विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे. ******

No comments: