06 May, 2025

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 06 : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र व संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) 2025 या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येत आहेत. परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर दिनांक 25 एप्रिल, 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. शिक्षक निवडीकरीता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीकरीता पात्र राहतील. त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ठ असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील. परंतु शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाणार नाहीत व पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात येईल, अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य आहे. या मुदतीत असे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर न केल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे त्याचा शिक्षक पदभरतीसाठीचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही. विहित मुदतीत गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण व या गुणांनुसार त्याचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/ या लिंकवर भरावेत, असे आवाहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. ******

No comments: