08 May, 2025

जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्रेत्यांची खरीप हंगामपूर्व कार्यशाळा संपन्न

हिंगोली(जिमाका),दि.०८ : खरीप हंगामाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कार्यशाळेत कृषी आयुक्तालयाचे प्रतिनिधी शेषराव डोळे, कृषी विकास अधिकारी अतुल वायसे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक नितीन घुगे, जिल्हा कृषी अधिकारी संग्राम जाधव, तालुका कृषी (सेनगाव) अधिकारी संदीप वळकुंडे, गोविंद काळे (औंढा नागनाथ), शिवसंदीप रणखांब (हिंगोली) यांच्यासह जिल्ह्यातील कृषी अधिकारी, पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेषराव डोळे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर कृषी विकास अधिकारी अतुल वायसे यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर सादरीकरण केले. यामध्ये साथी पोर्टलचा वापर, बीज प्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता तपासणीचे महत्त्व, कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची आवश्यक काळजी आणि कापूस तसेच इतर पिकांच्या तक्रारींसाठी असलेल्या तक्रार निवारण समितीच्या कार्याची माहिती देण्यात आली. यावेळी विक्रेते असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आनंद निलावार यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यशाळेत जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी सक्रीय सहभाग घेतला आणि उपयुक्त माहिती जाणून घेतली. जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या या कार्यशाळेमुळे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला अधिक बळ मिळणार असून, शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा वेळेवर उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. ********

No comments: