01 April, 2017

मुद्रा बँक योजनेच्या साह्याने यशस्वी उद्योजक होण्याची संधी

                                                     -- विजय अवधाने

        हिंगोली, दि.31: शहरी व  ग्रामीण भागात ज्या तरुणांना नोकरीऐवजी स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरु करता यावे यासाठी केंद्र शासनाने मुद्रा बँक योजना कार्यान्वित केली आहे. जिल्ह्यातील तरुणांना या योजनेच्या साह्याने यशस्वी उद्योजक होण्याची संधी प्राप्त झाली असल्याचे प्रतिपादन तहसीलदार विजय अवधाने यांनी केले.
            जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी विनाजामीन-विनातारण सहज कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या माध्यमातून ग्रामीण स्वंयरोगजार प्रशिक्षण केंद्र, हिंगोली आणि जिल्हा अग्रणी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण स्वंयरोगजार प्रशिक्षण केंद्र, हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना मेळाव्यात श्री. विजय अवधाने बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक पी. आर शिंदे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक जे. टी. बोथीकर, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अशोक गटाणी आणि ग्रामीण स्वंयरोगजार प्रशिक्षण केंद्राचे संचालक श्रीकांत दिक्षीत यांची उपस्थिती होती.
            पुढे श्री. अवधाने म्हणाले की, कोणताही उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रत्येकास भांडवल उभे करण्याची मोठी समस्या निर्माण होती. परंतू मुद्रा बँक योजनेमुळे या समस्या संपली असून, सदर योजनेमुळे सहजरित्या कर्ज उपलब्ध होण्याची संधी प्राप्त झाली आहे. मुद्रा बँक योजनेतंर्गत जिल्ह्यातील बँकानी लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करुन कर्ज वितरणामध्ये चांगले काम केले आहे. परंतू लाभार्थ्यांनी देखील त्यांना मंजूर झालेल्या कर्जाचा वापर हा उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठीच करावा. तसेच आपला उद्योग व्यवसाय वाढवून बँकेचे कर्जाची परतफेड वेळेत करावी. कर्जाची परतफेड वेळेत केल्याने बँकाना लाभार्थ्याप्रती विश्वास निर्माण होईल. आणि इतर लाभार्थ्यांना देखील बँकाना कर्ज देणे सोयीचे होईल. लाभार्थ्यांने सुरु केलेल्या उद्योग-व्यवसायात तो यशस्वी झाला तरच या योजनेचे उद्दिष्ट पुर्ण होईल असे ही श्री. अवधाने यावेळी म्हणाले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी म्हणाले की, राज्यातील तरुणांना स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य तसेच देशातंर्गत रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी केंद्र शासनाने मुद्रा बँक योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेनूसार शिशु, किशोर आणि तरुण या तीन गटातंर्गत उद्योग-व्यवसायासाठी 10 हजार ते 10 लाखपर्यंत विनाजामीन विनातारण कर्ज मिळणार आहे. या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना जिल्हा सहकारी बँक, राष्ट्रीय बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, बिगर बँक वित्तीय संस्था इत्यादींमार्फत कर्ज मिळणार आहे. या योजनेतंर्गत लाभार्थ्यास कर्ज घेण्यास समस्या किंवा अडचण निर्माण झाल्यास संबंधीतांनी जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे समन्वयक जिल्हा नियोजन अधिकारी आणि जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांच्याकडे आपली तक्रार नोंदवावी.
            प्रास्ताविकात जिल्हा अग्रणी बँकेचे श्री. शिंदे म्हणाले की, जिल्ह्यात मुद्रा बँक योजनेतंर्गत कर्ज वितरणाचे चांगले काम झाले आहे.  जिल्ह्यातील तरुणांना स्वत:चा उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुद्रा बँक योजनेतंर्गत आतापर्यंत शिशु, किशोर आणि तरुण गटातील एकूण 1 हजार 299 लाभार्थ्यांना 20 कोटी 37 लाख रुपये कर्जाचे वितरण करण्यात आल्याची माहिती दिली.
            यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक जे. टी. बोथीकर, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अशोक गटाणी यांनीही उपस्थित लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले.
            आज आयोजित मेळाव्यात स्टेट बँक ऑफ हैद्राबादने 09 लाभार्थ्यांना 11.20 लाख तर अलाहाबाद बँकेने 02 लाभार्थ्यांना 1.75 लाख, विजया बँकेने 01 लाभार्थ्यांस 1.00 लाख, ओरियंटल बँक ऑफ कॉमर्सने 02 लाभार्थ्यांना 4.00 लाख, आयडीबीआय बँकेने 02 लाभार्थ्यांना 6.85 लाख, देना बँकेने 02 लाभार्थ्यांना 1.80 लाख, बँक ऑफ इंडियाने 01 लाभार्थ्यांस 75 हजार, पंचाब नॅशनल बँकेने 01 लाभार्थ्यांस 50 हजार,  महाराष्ट्र ग्रामीण बँकेने 06 लाभार्थ्यांना 5.25 लाख आणि बॅंक ऑफ बडोदाने 02 लाभार्थ्यांना 1 लाख  असे एकूण 28 लाभार्थ्यांना 34.10 लाख रुपये मुद्रा बँक योजनेतंर्गत या बँकांनी कर्ज मंजूरी आदेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामीण स्वंयरोगजार प्रशिक्षण केंद्राच्या अध्यापक दिपाली काळे यांनी केले तर ग्रामीण स्वंयरोगजार प्रशिक्षण केंद्राचे संचालक श्रीकांत दिक्षीत यांनी आभार मानले. यावेळी मेळाव्यास मोठ्या संख्येने नवउद्योजकांची उपस्थिती होती.

*****


 

No comments: