15 April, 2017

वीजेचा वापर केला नसल्यास शेतकऱ्यांचे वीज देयक रद्द करा
                                                                                            -- पालकमंत्री दिलीप कांबळे
हिंगोली, दि.15: जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना वीजेचा वापर न करता ही त्यांना महावितरणमार्फत वीजेचे देयके देण्यात आली आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांच्या वीजेची देयके तात्काळ रद्द करण्याचे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप व पुनर्वसन आणि अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. कांबळे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शिवराणी नरवाडे, नगराध्यक्ष बाबारावजी बांगर, खासदार राजीव सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार डॉ जयप्रकाश मुंदडा, जिपचे उपाध्यक्ष श्री. पंतगे, कृषी सभापती श्री. राखुंडे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री कांबळे पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील बँकांनी खरीप हंगामापूर्वी सर्व शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाबाबत त्यांच्या आवश्यकतेनुसार अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करा. शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर करण्यासाठी बॅकांनी  हस्तलिखीत आणि ऑनलाईन सातबारा गृहीत धरावे व पीक कर्जाचे वितरण करावे. प्रधानमंत्री कृषि पीक विमा योजनेतंर्गत सर्व पिकांना विम्याचे संरक्षण देण्यात येणार असून जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन खरीप हंगामात पीक नुकसानीपासून  होणाऱ्या आपल्या आर्थिक नुकसान टाळावे. विद्युत जोडणीसाठी अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना महावितरणने तात्काळ वीज जोडणी देण्यात यावी.
शेती औजारे खरेदीसाठीचे अनुदान आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांच्या वेळेची बचत होऊन त्यांना वेळेत अनुदान प्राप्त होणार आहे. तसेच  शेतकऱ्यांना दर्जेदार खते मिळावी तसेच खत वितरणात पारदर्शकता यावी यासाठी प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर पॉस मशिनद्वारे ऑनलाईन खतांची विक्री होणार आहे. तसेच ऑनलाईन खत खरेदी केल्यास शेतकऱ्यांना 25 रुपये अधिक द्यावे लागत असल्याने याकरीता शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगले प्रमाणित बियाणे व खते मिळावीत याकरिता कृषि विभागाने दक्षता घ्यावी. बियाणे व खतांमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये व त्यांचा काळाबाजार होणार नाही याबाबत सतर्क रहावे. तसेच जिल्ह्याकरीता 10 हजार सिंचन विहीरी मंजूर झाल्या असून, ग्रामसभेने मंजूर केलेल्या विहिरींना तात्काळ मंजूरी देण्याचे निर्देश ही श्री. कांबळे यांनी यावेळी दिले.
प्रारंभी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. लोखंडे यांनी जिल्ह्यात 2017-18 मध्ये 3 लाख 90 हजार हेक्टर संभाव्य पेरणी क्षेत्रावर खरीप पिकांच्या लागवडीचे उद्दिष्ट असुन, प्रस्तावित पेरणी क्षेत्रावर सर्व पिकांच्या 97 हजार 567 क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात 10 हजार 751 हेक्टरने घट होत असून,  तूर पिकाच्या क्षेत्रात मागील वर्षीच्या प्रमाणात 01 हजार 275 हेक्टरची संभाव्य वाढ होत आहे. संकरित कापसाच्या क्षेत्रात 7 हजार 285 हेक्टरने घट होत असल्याचे सांगितले. तसेच मुग 186 हे., उडीद 27 हे. आणि खरीप ज्वारी मध्ये 426 हेक्टरने  वाढ होत असल्याची माहिती श्री. लोखंडे यांनी दिली.
कृषि विकास अधिकारी अंकुश डुबल यांनी खरीप हंगामाकरिता 3 लाख 45 हजार 387 हेक्टर संभाव्य क्षेत्राकरिता 97 हजार 567 क्विंटल बियाणे खाजगी आणि सार्वजनिक प्रणालीमार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच खरीप हंगामासाठी शासनामार्फत विविध ग्रेड निहाय रासायनिक खताचे 59 हजार 700 मे.ट. मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या हस्ते कृषी विभागाने तयार केलेल्या कृषी मार्गदर्शिका तसेच विविध विषयावरील घडीपत्रिकांचे विमोचन करण्यात आले.                          *****


No comments: