13 November, 2017

दर्जेदार रस्ते तयार करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा
-          मंत्री चंद्रकांत पाटील
·         राज्य मार्ग 30 नोव्हेंबर तर प्रमुख जिल्हा मार्ग 15 डिसेंबर पर्यंत खड्डेमुक्त करण्याच्या सूचना
        हिंगोली, दि.13: पावसाळ्यानंतर रस्त्यांची दुरावस्था होते वारंवार रस्त्यांची दुरूस्ती करून देखील खड्डे होतात. परंतू इतर राज्यांमध्ये रस्ते बांधण्यासाठी वापरण्यात येणारे नवीन तंत्रज्ञान वापर करुन खड्डे बुजविण्यासाठी आणि दर्जेदार रस्ते तयार करण्यासाठी नवीन उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी परभणीत अधिकार्‍यांना दिले.
            परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात हिंगोली जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाची खड्डेमुक्त रस्ते अभियाना अंतर्गत सोमवार  रोजी आढावा बैठक झाली. यावेळी श्री. पाटील हे  बोलत होते. यावेळी बैठकीस आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, मुख्य अभियंता मुकुंद सुरकुटवार, उपसचिव के. टी. पाटील, अधीक्षक अभियंता संतोष शेलार, कार्यकारी अभियंता एस.जी. देशपांडे, राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता श्री. मिठ्ठेवाड  यांची  प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी श्री. पाटील म्हणाले की, हिंगोली जिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्त करुन दर्जेदार रस्ते तयार करण्यासाठी योग्य नियोजन करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन काम करण्याची आवश्यकता आहे. हिंगोली जिल्ह्यातील राज्य मार्ग 30 नोव्हेंबर तर प्रमुख जिल्हा मार्ग हे 15 डिसेंबर पर्यंत खड्डेमुक्त करण्याच्या सूचना दिल्या. रस्त्यांची कामे चांगले व दर्जेदार करावीत. उत्कृष्ट काम करणार्‍या अधिकारी-कर्मचारी यांची दखल घेणार असल्याचेही श्री. पाटील यावेळी म्हणाले.
            यावेळी मुख्य अभियंता मुंकुद सुरकुटवार यांनी मराठवाडा विभागाची भौगोलिक परिस्थितीबाबत माहिती सादर केली. यावेळी अधिकाऱ्यांनी कामे करतांना येत असलेल्या समस्या देखील श्री. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
             यावेळी बैठकीस हिंगोली जिल्ह्यातील उप विभागीय अभियंता बी.बी. निठकंठ, सी.आर. तोटावार, जी. एस. लोखंडे यांच्यासह कनिष्ठ अभियंता व शाखा अभियंता यांची उपस्थिती होती.
           
*****


No comments: