18 November, 2017

तीव्र कुपोषित बालकांसाठी लवकरच ग्राम बाल विकास केंद्र सुरू होणार
                                                                                        -- उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक)

            हिंगोली, दि.18: जिल्ह्यामध्ये 0 ते 6 वयोगटातील बालकांचे स्क्रिनींग करुन त्यामधून कुपोषित बालकांची निवड करण्यात येते. महिला बाल कल्याण विभागामार्फत केलेल्या स्क्रिनींगनुसार 482 तीव्र कुपोषित बालके आणि 1 हजार 271 मध्यम कुपोषित बालके आहेत. शासनाच्या निर्देशानुसार तीव्र कुपोषित बालकांसाठी लवकरच ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच अंगणवाडी सेविकामार्फत तीव्र कुपोषित बालके व मध्यम कुपोषित बालके यांच्या पालकांचे वेळोवेळी समुपदेशन करण्यात येऊन बालकांना चौरस आहार देण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) यांनी कळविले आहे.
अंगणवाडी केंद्रातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे दरमहा वजन घेण्यात येऊन त्यानुसार बालकांची श्रेणी ठरविण्यात येते. माहे ऑक्टोबर या महिन्यात घेतलेल्या एकूण 99 हजार 975 बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 83 हजार 108 बालकांचे वजन घेण्यात आले. त्यापैकी 71 हजार 569 बालके सर्वसाधारण श्रेणी (86.12 टक्के) normal, 9 हजार 241 बालके मध्यम कमी वजनांची (11.12 टक्के) 2 हजार 298 तीव्र कमी वजनांची  बालके (2.76 टक्के)  आहेत. याप्रमाणे जिल्ह्याची  मासिक प्रगती अहवालावरुन सद्य:स्थिती आहे.
तीव्र कमी वजनांची बालके व कमी वजनांच्या बालकांना अतिरिक्त पोषण आहार देण्यात येऊन त्यांचे  श्रेणीवर्धन करण्यात येऊन सदर बालकांना सर्वसाधारण श्रेणीमध्ये आणण्यासाठी  यंत्रणेकडून विशेष प्रयत्न  केले जात आहेत. तसेच संबंधित बालकांच्या पालकांचे निदर्शनास हि बाब आणण्यात येऊन अंगणवाडी कार्यकर्ती मार्फत त्यांचे समुदेशन करण्यात येत असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण, जिल्हा परिषद यांनी कळविले आहे.

*****

No comments: