17 November, 2017

जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजना
जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजना आहेत. या योजनेच्या माध्यमातून लाभ घेवून स्वत:चा उद्योग आपण उभा करु शकता.
जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रशिक्षण व बीजभांडवल योजना
जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील तरुण तरुणींना रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम, सुशिक्षित बेरोजगारांसाठी बीज भांडवल अर्थसहाय्य आणि जिल्हा उद्योग धारकांसाठी कर्ज योजना राबविल्या जात आहेत.
जिल्हा उद्योग केंद्राच्या या योजनांमध्ये उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम योजनेतून अनुसूचित जातीच्या सुशिक्षित बेरोजगारांना विकास आणि तांत्रिक प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी त्याची तयारी करण्यास प्राध्यान्य दिले आहे. यासाठी अटी व शर्तीमध्ये उमेदवार अनुसूचित जातीचा असावा. उमेदवार किमान 7 वी पास किंवा पदवी/पदविका/आयटीआय प्रमाणपत्र किंवा किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रम प्रमाणपत्रधारक असावा. उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे. उमेदवार कोणत्याही वित्त संस्थेचा थकबाकीदार नसावा. या योजनेसाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने लाभार्थ्याला विद्यावेतन देण्याची तरतूद आहे.
सुशिक्षित बेरोजगारांसाठी बीज भांडवल अर्थसहाय्य योजनेतून सुशिक्षित बेरोजगारांना लघु उद्योग किंवा इतर विविध प्रकारच्या धंद्यातून स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने अर्थसहाय्य करण्यात येते. या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये लाभार्थ्यांची पात्रता 18 ते 50 वयोगटातील किमान 7 वी पास अशा स्थानिक व्यक्ती बीजभांडवलाची कमाल मर्यादा उत्पादन घटकासाठी रुपये 5 लाख व सेवा व्यवसायासाठी रुपये 2 लाख तसेच उद्योग व्यवसायासाठी प्रकल्प खर्चाची कमाल मर्यादा उत्पादन घटकासाठी रु.25 लाख व सेवा व्यवसायासाठी रु.10 लाख राहील. स्वगुंतवणूक अनुसूचित जातीसाठी 5 टक्के राहील. परतफेडीचा कालावधी एकूण 7 वर्षांचा असून त्यामध्ये सुरुवातीच्या तीन वर्षांचा विलंबावधी समाविष्ट राहील. व्याजाचा दर 6 टक्के असून मुदतीत भरल्यास 3 टक्के सूट राहील. विहीत दिनांकानंतर कर्जाची परतफेड केल्यास थकीत रक्कमेवर 1 टक्के दंडव्याज आकारण्यात येतो. या योजनेत बीज भांडवल कर्ज उपलब्ध होते.
जिल्हा उद्योगधारकासाठी कर्ज योजनेंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविल्या जाणाऱ्या कर्ज योजनेखाली ग्रामीण भागातील अति लहान उद्योगांना मार्जिन/बीज भांडवल दिले जात आहे. या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये उद्योगाच्या ठिकाणी लोकवस्ती एक लाखापेक्षा कमी असावी. शिक्षणाची व वयाची अट नाही, उत्पादन/सेवा उद्योग आवश्यक प्रकल्प मर्यादा रु. 2 लाख, अनुसूचित जाती जमातीसाठी मार्जीन मनी 30 टक्के (कमाल रु.60,000/- ) स्व.गुंतवणूक 5 टक्के, उर्वरित रक्कम बॅंकेकडून प्रचलीत व्याज दराने स्थिर भांडवल कर्ज परतफेड सात वर्षे, खेळते भांडवल कर्ज परतफेड चार वर्षे, सहामाही कर्ज परतफेड (सहा हप्ते) व्याज दर चार टक्के, थकीत रक्कमेवर एक टक्का व्याज आकारण्यात येतो. या योजनेतून पात्र लाभार्थीना जिल्हा उद्योग केंद्र (बीजभांडवल) उपलब्ध होते.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांच्याशी संपर्क साधावा.

जिल्हा माहिती कार्यालय
हिंगोली

*****

No comments: