17 March, 2021

जिल्ह्यातील स्वीट मार्ट, बेकरीची दुकाने सकाळी 10.00 ते सायंकाळी 07.00 या वेळेत उघडण्यास परवानगी

 


हिंगोली, (जिमाका) दि. 17 : राज्यात तसेच जिल्ह्यात कोव्हीड-19 बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील दुकानांच्या बाबतीत वेळेचे निर्बंध व RTPCR तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. या दरम्यान जिल्ह्यातील स्वीट मार्ट, बेकरी दुकाने यांना सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 या वेळेत त्यांची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती.

आता जिल्ह्यातील स्वीट मार्ट, बेकरीची दुकाने सकाळी 10.00 ते सायंकाळी 07.00 या वेळेत उघडण्यास जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, हिंगोली यांनी परवानगी दिली आहे. ही परवानगी केवळ पार्सल सुविधेसाठी राहील. या दरम्यान शासन स्तरावरून कोरोनाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, केंद्रावर येणाऱ्या व्यक्तींनी तसेच केंद्र चालकांनी मास्कचा वापर करणे, तसेच दुकानाची व साहित्याची वेळोवेळी स्वच्छता, सॅनिटायझरेशन (Sanitization) करण्याची दुकानदार यांनी दक्षता घ्यावी. तसेच दुकानदार व त्यांचे कर्मचारी यांची दर 15 दिवसाला RTPCR तपासणी व इतर सूचनांचे पालन करणे अनिवार्य असेल याची नोंद घ्यावी.

या आदेशाची आवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

****

No comments: