23 March, 2021

कृषी विज्ञान केंद्रात जागतिक जल दिवस साजरा

 


हिंगोली, (जिमाका) दि. 23 : कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरु फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने " जागतिक जल दिवस " च्या निमित्ताने दिनांक 22 मार्च, 2021 रोजी  " पाण्याची किंमत " (Valuing Water ) या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

या प्रसंगी केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी शेती मधील पाण्याचे महत्व सांगून जल संधारणामध्ये कृषी विज्ञान केंद्राद्वारे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांविषयी माहिती सांगितली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय  सहाय्यक प्राध्यापक प्रा. मधुकर मोरे हे  होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. मधुकर मोरे यांनी उपलब्ध पाण्याचा सिंचनासाठी कार्यक्षम वापर कसा करावा, प्रति लिटर पाण्यात अधिकतम उत्पादन कसे घ्यावे, विविध पिकांशी पाण्याची गरज व त्यानुसार नियोजन व ताळेबंद, भूजल पुनर्भरण व सिंचनाच्या विविध पद्धती विषयी सखोल माहिती दिली .

याप्रसंगी  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. यामध्ये कु. तृप्ती भालताडक यांनी बायो इथेनॉल, कु. गोदावरी घोरसाड यांनी निचरा व सूक्ष्म सिंचन, कु. आरती इंगळे यांनी पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन व कृत्रिम पुनर्भरण, कु. स्वप्नाली लबडे यांनी ठिबक सिंचन पद्धती,  कु. धनश्री कोटे यांनी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, कु. विद्या पोटे यांनी सेंद्रीय शेती, कु. वर्षा शिंदे यांनी संगणक  आधारित सिंचन पद्धती,              कु. शिरीषा येन्नावर यांनी भूजल व्यवस्थापन शास्त्र व ऋषिकेश होळकर यांनी ठिबक सिंचन या विषयांवर सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राजेश भालेराव तर आभार प्रा. अजयकुमार सुगावे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी प्रा. अनिल ओळंबे, प्रा. रोहिणी शिंदे, डॉ. कैलास गीते,  श्री. विजय ठाकरे, सौ.मनीषा मुंगल,  श्री. संतोष हनवते यांचे सहकार्य लाभले.

****

No comments: