01 March, 2021

जिल्ह्यातील सर्व आस्थापना, दुकानदार यांच्या अँटीजेन तपासण्या करणे बंधनकारक --- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आदेश

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 01 : राज्यात तसेच जिल्ह्यात कोवडि-19 बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व आस्थापना मालक, दुकानदार तसेच जिल्ह्यात येणाऱ्या व जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची अँटीजेन तपासणी करण्याचे आदेश यापूर्वीच निर्गमित केले आहेत. त्याअनुषंगाने सध्या जिल्ह्यात सुरु असलेल्या संचारबंदी नंतर जिल्ह्यातील सर्व आस्थापना मालक, दुकानदार यांना त्यांची आस्थापना, दुकाने उघडण्यासाठी अँटीजेन तपासण्या करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या आस्थापना मालक, दुकानदार व त्यांच्या येथे काम करणारे कर्मचारी यांची कोरोना रॅपिड अँटीजेन तपासणी  अहवाल निगेटीव्ह आली आहे अशांना त्यांची आस्थापना, दुकाने उघडण्यास परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत .

यासाठी आरोग्य विभागामार्फत यापूर्वी आस्थापना मालक, दुकानदार (सर्व प्रकारची दुकाने) यांच्या अँटीजेन तपासण्यासाठी उभारण्यात आलेल्या कॅम्पप्रमाणे यावेळी देखील  जिल्ह्यातील सर्व आस्थापना मालक, दुकानदार व त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना अँटीजेन तपासणी करण्यासाठी कॅम्प उभारुन तपासण्या करण्यात याव्यात . यासाठी आरोग्य विभागाने पोलीस विभाग, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी नगर परिषद/नगर पंचायत इ. व इतर संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय साधून तात्काळ कार्यवाही करावी. यानुसार जिल्ह्यातील सर्व आस्थापना, दुकानदार यांच्या अँटीजेन तपासण्या करण्यात याव्यात. यामध्ये जे नागरिक कोरोना बाधित आढळतील अशांना कोरोनाच्या अनुषंगाने उपचारासाठी कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत.

या आदेशाची आवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

या आदेशाची सक्तीने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. हिंगोली, पोलीस अधीक्षक, हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक , जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. हिंगोली, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी, नगर परिषद/नगर पंचायत, ग्रामसेवक, तलाठी व इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

*******

No comments: