03 September, 2026

स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील 11 गावांचा प्रकल्पात समावेश

 स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील 11 गावांचा प्रकल्पात समावेश


हिंगोली, दि. 3 सप्टेंबर (जिमाका) : राज्यातील निवडक जिल्ह्यांतील गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्प राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या प्रकल्पाच्या प्रथम टप्प्यात हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील 11 गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सांडस, सालेगाव, सोडेगाव, सावंगी तर्फे नांदापूर, सेलसूरा, उमरा, रामवाडी, असोलवाडी, कळमकोंडा, शेनोडा आदी गावांचा समावेश आहे.


या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गठित जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, एसजीजीएस महाविद्यालय, नांदेडचे टेक्निकल ॲकर इन्स्टिट्यूटचे (TAI) अनिल गोंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) केशव गड्डापोड यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.




गावनिहाय सर्वेक्षणातून अडचणींचे विश्लेषण


प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या 11 गावांचे एसजीजीएस महाविद्यालय, नांदेड येथील टेक्निकल ॲकर इन्स्टिट्यूट (TAI) मार्फत गावनिहाय सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणातून ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी तसेच त्या सोडविण्यासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाधारित पर्यायांचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालाचे सादरीकरण अनिल गोंडे यांनी पीपीटीच्या माध्यमातून समितीसमोर केले.


यावेळी अकरा गावांमधील समस्यांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कृषी, नागरी सुविधा, आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण, शासन सेवा, आरोग्य आणि उपजीविका या क्षेत्रांतील अडचणी व त्यावरील तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांची माहिती सादरीकरणातून देण्यात आली.


जिल्ह्यातील हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टेक्निकल ॲकर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक गावात निदानात्मक गरज मूल्यांकन (Diagnostic Need Assessment) पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. यामाध्यमातून प्रत्येक गावाच्या स्थानिक गरजा, उपलब्ध साधनसंपत्ती आणि ग्रामस्थांच्या समस्या यांचे अचूक मूल्यांकन करून तंत्रज्ञानाच्या दृष्टीने योग्य उपाययोजना निश्चित केल्या जाणार आहेत अशी माहिती देण्यात आली.

No comments: