03 September, 2026

जिल्हा वार्षिक योजना निधी मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता जिल्हा वार्षिक योजनेतील कामकाजाचा घेतला आढावा

 जिल्हा वार्षिक योजना निधी मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत

– जिल्हाधिकारी राहुल गुप्ता 


जिल्हा वार्षिक योजनेतील कामकाजाचा घेतला आढावा


हिंगोली, दि. 3 सप्टेंबर (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना सन 2026-27 अंतर्गत निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक योजनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.


निधी प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित विभागांनी कामांचा युनिक आयडी (MHUID) तयार करावा. त्यानंतर संकेतस्थळावर प्रशासकीय मान्यता (AA) तसेच तांत्रिक मान्यता अपलोड करावी. विविध विकास योजनांतील निधी वितरणासाठी संबंधित विभागांनी प्रस्ताव आय-पास प्रणालीवर अपलोड करणे अनिवार्य आहे. प्रस्ताव अपलोड न केल्यास निधी वितरित केला जाणार नाही. वितरित निधीचा विहित कार्यपद्धतीनुसार काटेकोरपणे वापर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.


बैठकीत सन 2026-27 च्या वार्षिक योजनेचे प्रारूप आराखडे तात्काळ सादर करण्याबाबतही निर्देश देण्यात आले. नवीन कामांना प्रशासकीय मान्यता, निधी वितरण प्रक्रिया, सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, पायाभूत सुविधा प्रकल्पांना युनिक आयडी देणे प्रस्ताव आदी बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


शिक्षण विभागांतर्गत शाळांच्या वर्गखोल्यांची दुरुस्ती तसेच आदर्श शाळा बांधकामाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. जिल्ह्यातील मोठ्या शाळांमध्ये सुसज्ज व्यायामशाळा उभारण्यासाठी व्यायामशाळेची खोली आणि आवश्यक साहित्य यांचा समावेश असलेले एकत्रित प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले. काम सुरू करण्यापूर्वीची तसेच काम पूर्ण झाल्यानंतरची छायाचित्रे सादर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


प्रस्तावामध्ये करण्यात येणाऱ्या कामाचा तपशील तसेच कामाची सद्यस्थिती स्पष्टपणे नमूद करावी, असे निर्देश देत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हा परिषद, आरोग्य, नगरविकास, शिक्षण, जलसंधारण, महिला व बाल विकास, महावितरण यासह विविध विभागांच्या प्रस्तावित व प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेतला.


जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, अंगणवाडी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, पंचायत समिती इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन जिल्हा वार्षिक योजनेतूनच करावेत. तसेच कार्यालयानी यामध्ये ऑफग्रीड सोलार घेवू नये अशाही सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. 


या जिल्हा वार्षिक योजनेतील सर्व कामांच्या प्रगतीचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांनी प्रलंबित प्रस्तावांची पूर्तता करून निधी मागणीचे प्रस्ताव वेळेत सादर करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

00000

No comments: