24 September, 2026

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून गरजू व पात्र लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचविणार – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 


जिल्ह्यात २५ गावांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन; शिबिरात सुमारे ७०० प्रमाणपत्रांचे वितरण

हिंगोली, दि. २४ (जिमाका) : शासनाच्या निर्देशानुसार दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून गरजू व पात्र नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा, प्रमाणपत्रे तसेच विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, एकही पात्र नागरिक शासकीय सेवा व योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासनामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.



सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी अभियानाच्या अंमलबजावणीबाबत माध्यम प्रतिनिधींना माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रगती चौंडेकर तसेच विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, सेवा संकल्प अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यात प्रारंभी २५ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये नागरिकांना आवश्यक असलेली प्रमाणपत्रे, विविध शासकीय सेवा तसेच योजनांचा लाभ मिळत आहे किंवा नाही, याची माहिती घेण्यात आली आहे. पात्र असूनही आवश्यक प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत किंवा शासकीय योजनांचा लाभ मिळालेला नाही, अशा नागरिकांना आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानाच्या माध्यमातून प्रशासन थेट नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. निवडलेल्या २५ गावांमध्ये आयोजित विशेष शिबिरांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ७०० प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार येण्याची आवश्यकता भासू नये, तसेच प्रमाणपत्रे व विविध सेवांसाठी अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी स्थानिक पातळीवर शिबिरे घेऊन सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

सेवा संकल्प अभियान केवळ प्रारंभी निवडलेल्या २५ गावांपुरते मर्यादित न ठेवता टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. प्रारंभीच्या गावांमध्ये अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतल्यानंतर नागरिकांच्या गरजा आणि उपलब्ध सेवांचा विचार करून पुढील टप्प्यात अभियान अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत शासकीय सेवा व योजनांचा लाभ पोहोचविण्यास मदत होणार आहे.

प्रशासनाचा नागरिकांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न

दि. १७ सप्टेंबर रोजी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करून सेवा संकल्प अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संपर्क अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांच्या अडचणी स्थानिक पातळीवर जाणून घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शासकीय सेवा नागरिकांपर्यत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.

No comments: