21 September, 2026

लोकसंवाद कार्यक्रमात सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन


हिंगोली, दि. 21 : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकसंवाद उपक्रमांतर्गत लक्ष्मीनगर, अकोला बायपास रोड, बळसोंड, हिंगोली येथे आयोजित लोकसंवाद कार्यक्रमात नागरिकांना सायबर फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यश विमलकुमार शर्मा होते.

यावेळी पोलीस विभाग सायबर सेलचे इरफान पठाण यांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी विविध उपाययोजनांची माहिती दिली. OTP, UPI PIN, ATM PIN तसेच पासवर्ड कोणालाही सांगू नये, असे आवाहन त्यांनी केले. अनोळखी लिंक, QR Code किंवा APK File वर क्लिक अथवा डाउनलोड करू नये. बँक, पोलीस किंवा शासकीय अधिकारी असल्याचे सांगून फोन करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ विश्वास न ठेवता संबंधित यंत्रणेकडून माहितीची पडताळणी करावी, असे त्यांनी सांगितले.

सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती, कागदपत्रे व फोटो अनावश्यकपणे शेअर करू नयेत. ऑनलाइन खरेदी करताना विश्वासार्ह वेबसाइट किंवा अॅपचाच वापर करावा. संशयास्पद कॉल, SMS किंवा WhatsApp संदेश प्राप्त झाल्यास त्याला प्रतिसाद देण्यापूर्वी सत्यता पडताळून पाहावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा आणि www.cybercrime.gov.in या National Cyber Crime Reporting Portal वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले.

“सावधान रहा, माहिती सुरक्षित ठेवा आणि सायबर फसवणूक झाल्यास विलंब न करता 1930 वर संपर्क करा,” हा संदेश यावेळी नागरिकांना देण्यात आला. यावेळी सायबर सेलचे मारोती काकडे, प्रदीप झुंझारे,रंजन देशमुख हे उपस्थित होते.

यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वरिष्ठ लिपिक विशाखा शेंडगे, श्रीकांत देशमुख, मनोहर भारती, मानसी राऊत आदी उपस्थित होते.

No comments: