खासदार रामराव वडकुते यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये बालकांच्या हक्कांबाबत जनजागृती
हिंगोली, दि. १९ (जिमाका) : लोकसंवाद २०२६ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली शहरातील गणपती चौक येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या परिसरात बाल संरक्षण व बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या नागरिक, भाविक तसेच गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत बालकांच्या सुरक्षिततेचा आणि संरक्षणाचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा उत्सव आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधत बालकांचे हक्क, बालकांचे संरक्षण, बालविवाहाचे दुष्परिणाम तसेच बालविवाह रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची भूमिका याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी उपस्थित नागरिक, गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच भाविकांना बाल संरक्षण आणि बालविवाह प्रतिबंधाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बॅनर व माहितीफलकांच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली. बालविवाहामुळे बालकांच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि भविष्यातील संधींवर होणारे परिणाम याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली.
बालकांच्या सुरक्षिततेसाठी कुटुंबासह समाजातील प्रत्येक व्यक्तीने सजग राहणे आवश्यक आहे. बालकांशी संबंधित कोणतीही समस्या अथवा बालविवाहाची बाब निदर्शनास आल्यास संबंधित यंत्रणेला तातडीने माहिती देणे गरजेचे आहे. बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या विविध यंत्रणांमार्फत उपाययोजना करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या जनजागृती उपक्रमास खासदार रामराव वडकुते, फुलाजी शिंदे, विलास गोरे, रजनीश पुरोहित यांच्यासह सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी, नागरिक आणि भाविक उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसोबतच सामाजिक विषयांबाबत जनजागृती करण्यासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा.
बालविवाहास प्रतिबंध करणे, बालकांचे संरक्षण करणे आणि बालकांना सुरक्षित व पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
No comments:
Post a Comment