16 September, 2026

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्जाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत


हिंगोली, दि. १६ (जिमाका) : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना अंतर्गत ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.


या योजनेंतर्गत व्यावसायिक व अव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यासाठी शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं प्रवेश प्रणाली कार्यान्वित आहे.


राज्यातील संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागांवर प्रवेश सुरू करण्यासाठी यापूर्वी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, वसतिगृह संकेतस्थळावर अर्ज करताना आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे नव्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


विद्यार्थ्यांनी शासनाच्या https://hmasnew.mahait.org/ ऑनलाइन पोर्टलवर ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज भरावा. ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयात विहित मुदतीत सादर करावीत.


जिल्ह्यातील इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी गृहपाल तसेच मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृह, हिंगोली यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक प्रदीप धर्माधिकारी यांनी केले आहे.

No comments: