24 September, 2026

०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६


*आदर्श आचारसंहिता लागू*
*मतदार नोंदणीसाठी २६ सप्टेंबरपर्यंत मुदत*

हिंगोली दि. २४ सप्टेंबर  : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणूक-२०२६ चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

या मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. 

निवडणूक कार्यक्रमानुसार २९ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार असून, ६ ऑक्टोबर २०२६ ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. ७ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार असून, ९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत राहणार आहे. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार असून, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. 

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगर विभागातील संबंधित आठही जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू झाली आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष, संभाव्य उमेदवार, शासकीय व निमशासकीय यंत्रणा तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व घटकांनी भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

निवडणूक कालावधीत शासकीय यंत्रणेचा गैरवापर होणार नाही, मतदारांवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रभाव टाकला जाणार नाही तसेच निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडेल, यासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.

निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने  जिल्ह्यांमध्ये निवडणूक यंत्रणा सज्ज करण्यात येत असून, निवडणूक प्रक्रियेतील विविध बाबींसाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात येत आहेत. तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आदर्श आचारसंहितेच्या तरतुदी आणि निवडणूक प्रक्रियेबाबत आवश्यक माहिती देण्यात येत आहे. 

भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक ३ जानेवारी २०२३ रोजीच्या निर्देशानुसार, आगामी निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अर्ज सादर करण्याची मुदत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या १० दिवस अगोदरपर्यंत राहणार आहे. त्यानुसार पात्र नागरिकांना मतदार नोंदणीसाठीचे अर्ज दिनांक २६ सप्टेंबर २०२६ पर्यंतच सादर करता येणार आहेत. पात्र नागरिकांनी मुदतीपूर्वी आपले मतदार नोंदणी अर्ज संबंधित तहसिलदार, उपविभागीय अधिकारी तसेच प्राधिकृत अधिकारी यांच्‍याकडे सादर करून मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातील सर्व संबंधितांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन  जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. 

मतदार या वेबसाइटवर https://mahaelection.gov.in ऑनलाइन पद्धतीने देखील अर्ज मतदार भरू शकतात
***

No comments: