16 September, 2026

गणेशोत्सवाच्या जागतिक प्रचारासाठी हिंगोली जिल्ह्यात व्यापक जनसहभागाचे आवाहन ‘Bappa.org’ वर गणेशोत्सवाच्या परंपरा, कला व सांस्कृतिक वारशाची नोंदणी करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता



हिंगोली, दि. १६ (जिमाका) : महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक अस्मिता असलेल्या गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी राज्य शासनामार्फत व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत हिंगोली जिल्ह्यातील नागरिक, गणेशोत्सव मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, गृहनिर्माण संस्था, बचत गट, कलाकार व विविध सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्याच्या उद्देशाने शासनाच्या सर्व विभागांनी एकसंघ, समन्वित व सर्वसमावेशक पद्धतीने उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राची कला, संस्कृती, परंपरा, लोकजीवन, हस्तकला, उद्यमशीलता आणि सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडविणारी व्यापक लोकचळवळ आहे. त्यामुळे या परंपरेचा सातत्याने प्रचार व दस्तऐवजीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पुरातत्त्व संचालनालयामार्फत ‘Bappa.org’ हा अधिकृत मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मंचावर महाराष्ट्रासह देशभरातील तसेच ३५ हून अधिक जागतिक शहरांमधील गणेशोत्सवाशी संबंधित घरगुती व सार्वजनिक परंपरा, गणेशमूर्ती स्थापना, सजावट, हस्तकला, चालीरीती, कला सादरीकरण, खाद्यपरंपरा, आठवणी, छायाचित्रे व व्हिडिओ नागरिकांना WhatsAppच्या माध्यमातून नोंदविता व अपलोड करता येणार आहेत. या लोकसहभागातून महाराष्ट्राच्या गणेशपरंपरेचा अधिकृत व कायमस्वरूपी सांस्कृतिक दस्तऐवज तयार होणार आहे.

 ‘घरोघरी बाप्पा’ उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे 

हिंगोली जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण, पारंपरिक व ऐतिहासिक वारसा असलेल्या घरगुती गणेशोत्सवाची प्रतिष्ठापना, कौटुंबिक विधी, सजावट, पारंपरिक पद्धती, खाद्यपरंपरा तसेच अन्य वैशिष्ट्यपूर्ण बाबी Bappa.org वर नोंदविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. नोंदणी करणाऱ्या नागरिकांना शासनाच्या वतीने ‘Digital Cultural Preserver Certificate’ देण्यात येणार आहे.

तसेच जिल्ह्यातील मान्यवर कलाकार, लोककलावंत, पारंपरिक कलापरंपरा व विविध कलांशी संबंधित कला-कौशल्यांची माहितीही या मंचावर नोंदविण्यात यावी. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, निवासी कल्याणकारी संघटना, ग्रामपंचायती आणि बचत गटांच्या WhatsApp समूहांमधून Bappa.org ची लिंक व QR Code अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावा.

 प्रचार-प्रसारासह स्थानिक कला व कारागिरांना व्यासपीठ 

जिल्ह्यातील प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, ऐतिहासिक मंदिरे, शासकीय कार्यालये, बसस्थानके, रेल्वे स्थानके तसेच प्रमुख ठिकाणी प्रचार साहित्य, पोस्टर्स व QR Code प्रदर्शित करावेत. 

हिंगोली जिल्ह्यातील पारंपरिक कलावंत, गणेशमूर्ती घडविणारे कारागीर, हस्तकलाकार व लोककलावंत यांची माहिती, छायाचित्रे व व्हिडिओ Bappa.org वर उपलब्ध करून देण्यासाठीही संबंधितांनी पुढाकार घ्यावा. गणेशोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या शुभंकर चिन्हाचा (Mascot) प्रचार साहित्यामध्ये योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याची स्थानिक कला, संस्कृती, परंपरा आणि लोकजीवन जगासमोर नेण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. नागरिकांनी आपापल्या घरातील व परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सव परंपरांचे दस्तऐवजीकरण करून या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

No comments: