19 September, 2026

‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’मध्ये चमकण्याची सुवर्णसंधी ३० सप्टेंबरपर्यंत ‘विकसित भारत क्विझ’मध्ये सहभागी होता येणार.

हिंगोली १९ सप्टेंबर:-  हिंगोली जिल्ह्यातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींसाठी राष्ट्रीय स्तरावर आपल्या कल्पना आणि नेतृत्वगुण दाखविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयातर्फे आयोजित ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग-२०२७’ उपक्रमासाठी ‘विकसित भारत क्विझ’ला सुरुवात झाली असून, इच्छुकांना ३० सप्टेंबर अखेर सहभाग नोंदविता येणार असल्याचे जिल्हा युवा अधिकारी श्रद्धा वीर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या उपक्रमात विकसित भारत चॅलेंज, सांस्कृतिक विभाग, डिझाईन फॉर भारत, हॅक फॉर सोशल कॉज, युवा उद्योजक चॅलेंज आणि युवा संसद अशा सहा विभागांचा समावेश आहे. क्विझनंतर निबंध, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय निवड प्रक्रियेतून राष्ट्रीय स्तरासाठी युवकांची निवड केली जाणार आहे. 
१० ते १२ जानेवारी २०२७ दरम्यान नवी दिल्ली येथे अंतिम कार्यक्रम होणार असून, निवड झालेल्या युवकांना राष्ट्रीय नेतृत्वासमोर आपल्या कल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे. इच्छुकांनी ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी श्रद्धा वीर यांनी केले आहे.

No comments: