17 September, 2026

गणेशोत्सवात शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमनागरिकांनी उपक्रमात सहभागी होऊन योजनांचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली, दि. १७ (जिमाका) : गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनातील लोकसहभागाचा मोठा उत्सव असून, राज्य शासनाने या उत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, ग्रामपंचायती तसेच विविध ठिकाणी एकत्र येणाऱ्या नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, धोरणात्मक निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची माहिती पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी  केले आहे. 
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत असल्याने या लोकसहभागाचा प्रभावी उपयोग करून शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा उपक्रम केवळ योजनांची माहिती देण्यापुरता मर्यादित न ठेवता नागरिकांशी थेट संवाद, त्यांच्या शंकांचे निरसन तसेच पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यावर भर देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील प्रमुख व मानाच्या गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी तसेच ग्रामपंचायती आणि गर्दीच्या ठिकाणी ‘लोकसंवाद-२०२६’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाने मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.  
गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. नागरिकांनी ‘लोकसंवाद-२०२६’ कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या पात्रतेनुसार शासकीय योजनांची माहिती घ्यावी आणि योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
 ******

No comments: