08 September, 2026

भूमि अभिलेख कार्यालयाच्यावतीने ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत’ अभियानांतर्गत 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 कालावधीत तीन शिबिरांचे आयोजन

 भूमि अभिलेख कार्यालयाच्यावतीने ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत’

 अभियानांतर्गत 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 कालावधीत  तीन शिबिरांचे आयोजन


हिंगोली, दि. 8 (जिमाका) : भूमि अभिलेख कार्यालयाच्यावतीने ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ दि. 1 सप्टेंबर 2026 ते दि. 31 मार्च 2027 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील पक्षकारांना प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तीन लोकअदालती शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.


या अंतर्गत जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, हिंगोली यांच्या स्तरावर हिंगोली व कळमनुरी तालुक्यांसाठी 29 सप्टेंबर 2026 रोजी, उपअधीक्षक भूमि अभिलेख, सेनगाव यांच्या स्तरावर सेनगाव तालुक्यासाठी 28 डिसेंबर 2026 रोजी, तर उपअधीक्षक भूमि अभिलेख, वसमत यांच्या स्तरावर वसमत व औंढा नागनाथ तालुक्यांसाठी 9 मार्च 2027 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे.


तडजोडीस तयार असलेल्या दोन्ही पक्षकारांनी स्वतः किंवा वकिलामार्फत ‘प्रपत्र-अ’ (तडजोडनामा अर्ज) सादर करावा. प्राप्त अर्जांची कायदेशीर छाननी करून दोन्ही पक्षकारांची संमती निश्चित करण्यात येईल. सहमती झालेल्या प्रकरणांमध्ये कायदेशीर तडजोडनामा तयार करून लोकअदालतीच्या दिवशी अंतिम आदेश पारित करण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित पक्षकारांनी या संधीचा लाभ घेऊन आपली प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी या लोकअदालतीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments: