मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत दाटेगावचे राज्यस्तरीय मुल्यमापन
प्रधान सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी
महिला बचत गटांचा उत्स्फूर्त सहभागहिंगोली, दि. 6 (जिमाका): मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील दाटेगाव ग्रामपंचायतीचे राज्यस्तरीय मूल्यमापन शनिवारी (ता.05) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नेतृत्वाखालील राज्यस्तरीय मूल्यमापन समितीने गावाला भेट देऊन विविध विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि ग्रामविकासाच्या उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली.
राज्यस्तरीय मूल्यमापन समितीत आदर्श गाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, यशदा, पुणे येथील राज्य ग्रामीण विकास संस्थेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पंचायत राज विभागाचे संचालक गिरीश भालेराव, भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायत सरपंच शारदा गायधने आदींचा समावेश होता.
राज्यस्तरीय पथकाच्या भेटीपूर्वी हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी मागील महिनाभर दाटेगाव येथे वेळोवेळी बैठका घेऊन ग्रामस्थांना अभियानाच्या विविध निकषांबाबत मार्गदर्शन केले होते. ग्रामपंचायत, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थांनी मूल्यमापनासाठी नियोजनबद्ध तयारी केली होती.
दाटेगाव येथे आगमनानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी प्रधान सचिव डॉ. पुलकुंडवार व राज्यस्तरीय पथकाचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गडापोड, गटविकास अधिकारी विष्णू भोजे, दाटेगावच्या सरपंच कन्याकुमारी माने, उपसरपंच गिताबाई माने आदींसह जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामविकास विभागातील अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
समितीने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली. गावातील विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि ग्रामस्थांचा सहभाग याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. ग्रामस्वच्छता, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सहभागावर विशेष भर देण्यात आला. यावेळी मान्यवरांनी ग्रामस्थांना मार्गदर्शनही केले.
मूल्यमापन कार्यक्रमात दाटेगावसह परिसरातील महिला बचत गटांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. युवक-युवती आणि ग्रामस्थही उत्साहाने सहभागी झाले. महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती समितीसमोर सादर करण्यात आली. महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन, बचत गटांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, ग्रामस्वच्छता आणि सामाजिक उपक्रमांबाबतही समितीने माहिती घेतली.
ग्रामपंचायत दाटेगावने लोकसहभागातून राबविलेल्या विविध विकासकामांची समितीने प्रत्यक्ष पाहणी केली. ग्रामस्थांनी विकासकामांसाठी घेतलेला पुढाकार, महिला बचत गटांची सक्रिय भूमिका आणि प्रशासनाचा समन्वय यामुळे गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे यावेळी दिसून आले.
राज्यस्तरीय मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम केवळ मूल्यमापनापुरता मर्यादित राहिला नाही. ग्रामस्थांची एकजूट, महिलांचा सक्रिय सहभाग आणि लोकसहभागातून विकास साधण्याची सामूहिक इच्छाशक्ती यावेळी प्रकर्षाने दिसून आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींमध्ये विकासाभिमुख स्पर्धा, लोकसहभाग आणि विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला चालना मिळत असून, दाटेगावचा हा प्रयत्न इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.
राज्यस्तरीय मूल्यमापन समितीच्या भेटीमुळे ग्रामस्थांमध्ये नव्या उमेदीचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळातही लोकसहभागातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आला.
.jpeg)

.jpeg)


No comments:
Post a Comment