*कीटकनाशक फवारणी करताना सुरक्षिततेची काळजी घ्या; विषबाधा टाळण्यासाठी दक्षता आवश्यक*
*– जिल्हाधिकारी राहुल गुप्ता*
हिंगोली, दि. 7 (जिमाका) : कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशकांची फवारणी करताना निष्काळजीपणा अथवा अनावधानाने विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांनी फवारणीपूर्वी, फवारणीदरम्यान तसेच फवारणीनंतर आवश्यक ती सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कीटकनाशक विषबाधा व त्यावरील उपाययोजनांबाबत तज्ज्ञ समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी कीटकनाशक उत्पादक कंपन्या व कृषि विभागाने क्षेत्रीय स्तरावर व्यापक कार्यशाळांचे आयोजन करून शेतकरी व शेतमजुरांना सुरक्षित फवारणीबाबत मार्गदर्शन करावे तसेच विषबाधा टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती व प्रसिद्धी करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
फवारणी करताना वारा शांत असताना म्हणजे सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा फवारणी करावी. वाऱ्याच्या प्रवाहाच्या दिशेने फवारणी करावी. कीटकनाशक त्वचा व डोळ्यांच्या संपर्कात येणार नाही, तसेच त्याचे अंश नाकावाटे श्वसनमार्गात किंवा तोंडावाटे पोटात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. यासाठी मास्क किंवा रुमाल, सुरक्षा चष्मा, अंगभर कपडे व शक्यतो वॉटरप्रूफ सुरक्षा किटचा वापर करावा. पिकाची उंची एक फूट किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास गमबूट वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशके पिण्याचे पाणी व खाद्यपदार्थांपासून दूर सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. रिकामे डबे इतर कोणत्याही कारणासाठी वापरू नयेत तसेच ते वाहत्या पाण्यात धुवू नयेत. विहीर, नदी, ओढे, नाले व इतर पाणवठ्यांच्या संपर्कात ही रसायने येणार नाहीत याची काळजी घ्यावी. फवारणी करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांनी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी.
फवारणी करताना किंवा फवारणीनंतर अस्वस्थ वाटल्यास घरगुती उपचार न करता तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ढगाळ वातावरणात EC फॉर्म्युलेशनऐवजी SC फॉर्म्युलेशनच्या कीटकनाशके व बुरशीनाशकांचा वापर करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. फवारणीपूर्वी शरीराच्या उघड्या भागावर खोबरेल तेलाचे लेपन करण्याचा सल्लाही देण्यात आला.
बैठकीस शास्त्रज्ञ आर.एस. भालेराव, सहायक वनसंरक्षक एस.आर. माने यांचे प्रतिनिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, कृषि विकास अधिकारी ए.एस. वायसे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक लक्ष्मण काळे, तसेच तालुका स्तरावरील कृषि अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment