गोरेगाव येथील केंद्राला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट
हिंगोली, दि. ४ (जिमाका) : जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांमधून नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील आपले सरकार सेवा केंद्राला अचानक भेट देऊन पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रामार्फत नागरिकांना विविध प्रमाणपत्रे तसेच शासकीय योजनांशी संबंधित सेवांबाबत माहिती जाणून घेतली. केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा, नागरिकांना विहित मानदंडानुसार दिली जाणारी सेवा याबाबतही खात्री केली.
नागरिकांना आवश्यक सेवा विहित कालावधीत आणि शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केंद्र चालकांना दिल्या. तसेच गोरेगाव येथील अनधिकृत सीएससी केंद्रावर तातडीने कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी संबंधितांना दिले.
जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात येणार आहे. केंद्रे शासनाने निश्चित केलेल्या मानदंडांनुसार कार्यरत नसल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिला आहे.


No comments:
Post a Comment