हिंगोली जिल्ह्यात ‘सेवा, स्वच्छता, आरोग्य, पोषण व जनजागृतीच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी
हिंगोली, दि. २४ सप्टेंबर : जिल्हा परिषद, हिंगोलीच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, तसेच स्वच्छता, आरोग्य, पोषण, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभाग वाढावा, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
अभियानाच्या प्रारंभी १७ सप्टेंबर रोजी पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते जिल्हास्तरावर स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला तसेच त्यांच्या हस्ते २३ विविध दाखले व १४ घरकुल लाभ, असे एकूण ३७ लाभांचे वितरण करण्यात आले.
औंढा नागनाथ तालुक्यातील ग्रामपंचायत कंजारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ३२ विविध दाखले, आयुष्मान कार्ड व घरकुल कार्यारंभ आदेशांचे वितरण करण्यात आले. तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सेवा माझे योगदान उपक्रमांतर्गत पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विकसित भारत संकल्प यात्रा व मोटारसायकल रॅलीमध्ये सुमारे ८० नागरिकांनी, तर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या सेनगाव येथील सेवा ज्योत यात्रामध्ये सुमारे १५० नागरिकांनी सहभाग घेतला.
शिक्षण विभागामार्फत पाचही तालुक्यांतील शाळांमध्ये चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये विकसित भारत संकल्पनेबाबत जनजागृती करण्यात आली आहे.अंगणवाडी उत्सवांतर्गत जिल्ह्यातील १,०७२ अंगणवाडी केंद्रांपैकी ५०२ केंद्रांमध्ये आरोग्य तपासणी व पोषण आहार योजनांबाबत कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये अन्नप्राशन कार्यक्रम, गर्भवती व स्तनदा मातांच्या बैठका, बेबी केअर किट वाटप, पोषण प्रभात फेरी तसेच किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.
आशीर्वादाचा दिवा उपक्रमांतर्गत विविध योजनांच्या ५२४ लाभार्थ्यांच्या घरी दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच ८६४ लाभार्थ्यांच्या घरी आभार आणि संकल्पाची रांगोळी हा उपक्रम राबविण्यात आला.अभियानाच्या पुढील कालावधीत लाभार्थ्यांच्या यशोगाथांचे चित्रिकरण व सादरीकरण, कलापथक व नाट्यपथकाद्वारे शासकीय योजनांची जनजागृती तसेच विविध लोकसहभागी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
मृद व जलसंधारण विभागामार्फत जलस्रोत स्वच्छता, जलसंधारण, पाणीपुरवठा व नळजोडणीसंबंधी आवश्यक कार्यवाही, कचरा व्यवस्थापन व कचरा वर्गीकरण यावर विशेष भर देण्यात येत आहे.
अभियानाचा समारोप दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘जनसेवक महाकुंभ आयोजित करण्यात येणार आहे.सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून सेवा, स्वच्छता, जनजागृती आणि लोकसहभाग यांचा समन्वय साधून हिंगोली जिल्ह्यात विविध लोकाभिमुख उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.
सेवा संकल्प अभियानातील विविध उपक्रमांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, हिंगोलीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment