महाविद्यालयांना 15 सप्टेंबरपर्यंत त्रुटीपूर्तता व अर्ज सादरीकरणाची संधी
हिंगोली, दि. 11 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाचे शिष्यवृत्तीचे https://mahadbt.maharashtra.gov.in हे ऑनलाइन संकेतस्थळ सुरू झाले असून, हिंगोली जिल्ह्यातील महाविद्यालयांतील सन 2024-25 व 2025-26 मधील शिष्यवृत्तीसाठी पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज महाविद्यालयांनी तात्काळ निकाली काढावेत, असे आवाहन, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.
सन 2024-25 व 2025-26 मधील महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांमधील त्रुटींची पूर्तता करून अर्जांची तात्काळ तपासणी करावी. परिपूर्ण अर्ज शिष्यवृत्ती मंजुरीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्याकडे ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. जुन्या प्रलंबित अर्जांची त्रुटीपूर्तता, छाननी व पुढील कार्यवाहीसाठी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत महाडीबीटी पोर्टल सुरू राहणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी जुने प्रलंबित अर्ज तात्काळ तपासून त्यातील त्रुटींची पूर्तता करावी व परिपूर्ण अर्ज पुढील कार्यवाहीसाठी सादर करावेत. सन 2024-25 व 2025-26 या शैक्षणिक वर्षातील पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील.
या पोर्टलवर सन 2026-27 साठी नवीन शिष्यवृत्ती अर्ज करता येणार नाहीत. केवळ जुन्या महाविद्यालयस्तरावरील अर्जांमधील त्रुटींची पूर्तता व तपासणी करून संबंधित विद्यार्थ्यांचे अर्ज शिष्यवृत्ती मंजुरीसाठी ऑनलाइन पद्धतीने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली कार्यालयाकडे पुढे पाठवावेत. याबाबत महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित लिपिक यांनी तात्काळ कार्यवाही करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment