10 September, 2026

नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवावे - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन

 


हिंगोली, दि. 10 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे व हरकती सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कालावधीत पात्र नागरिकांना नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी, मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती तसेच अपात्र अथवा मृत व्यक्तींचे नाव वगळणीसाठी अर्ज करता येणार आहे. तरी या कालावधीत जिल्ह्यातील पात्र नवमतदारांनी या संधीचा लाभ घेऊन मतदार यादीत आपले नाव नोंदवून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रगती चौंडेकर, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्याची उपस्थिती होती.

ऑक्टोबर 2024 नंतर मतदार यादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आलेला नसल्यामुळे दि. 1 ऑक्टोबर 2024 नंतर वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या अनेक नवमतदारांना मतदार यादीमध्ये नाव नोंदविता आले नव्हते. आता दि. 1 ऑक्टोबर 2026 हा अहर्ताकारी दिनांक निश्चित करण्यात आला असून, या दिनांकास किंवा त्यापूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरे

दि. 1 ऑक्टोबर 2026 या अहर्ताकारी दिनांकानुसार 18 वर्षे पूर्ण झालेल्या आणि अद्याप मतदार म्हणून नोंदणी न झालेल्या युवकांची संख्या मोठी आहे. या युवकांना मतदार नोंदणीची प्रक्रिया सुलभतेने पूर्ण करता यावी, यासाठी महाविद्यालयांच्या कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. 

सुट्टीचे दिवस वगळता कार्यालयीन वेळेत महाविद्यालयांमध्ये ही विशेष शिबिरे घेण्यात येतील. पात्र युवकांनी आपल्या महाविद्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरात सहभागी होऊन मतदार नोंदणीसाठी आवश्यक अर्ज व कागदपत्रे सादर करावीत. 

महाविद्यालयांनीही शिकवणी वर्गांदरम्यान विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीबाबत माहिती द्यावी आणि पात्र नवमतदारांची जास्तीत जास्त नोंदणी होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

महाविद्यालयांनी मतदार नोंदणीसाठी महाविद्यालय स्तरावर विशेष उपक्रम राबवावेत. जनजागृतीवर भर द्यावा जेणेकरुन जास्तीत जास्त नवमतदार नोंदणी होईल अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. 

नमुना-6 संकेतस्थळावर उपलब्ध

नवीन मतदार नोंदणीसाठीचा नमुना-6 जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोलीच्या nic.hingoli संकेतस्थळावर ‘निवडणूक विभाग’ या मथळ्याखाली उपलब्ध करून देण्यात आला आहे. पात्र नागरिकांनी नमुना-6 भरून मतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी.

लोकशाही प्रक्रियेत मतदानाचा अधिकार हा प्रत्येक पात्र नागरिकाचा महत्त्वाचा अधिकार आहे. त्यामुळे दि. 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व पात्र युवकांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवून घ्यावे. तसेच मतदार यादीतील आपली नोंद तपासून आवश्यक असल्यास दुरुस्ती करून घ्यावी आणि विशेष सखोल पुनरिक्षणाच्या दावे व हरकती कालावधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

                                                                                         ***

No comments: