हिंगोली, दि. १० (जिमाका) : भारतीय डाक विभागाच्या परभणी डाक विभागामार्फत डाक जीवन विमा (PLI) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) योजनेंतर्गत ‘डायरेक्ट एजंट’ (विमा सल्लागार) पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हिंगोली मुख्य डाकघर, हिंगोली-४३१५१३ येथे घेण्यात येणार आहेत.
या पदासाठी उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. अर्जदाराने केंद्रीय किंवा राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थेची इयत्ता १० वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
बेरोजगार किंवा स्वयंरोजगार व्यक्ती, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचे माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्रामप्रधान, ग्रामपंचायत सदस्य आदी व्यक्ती या पदासाठी अर्ज करू शकतात.
उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार असून, यामध्ये व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्त्व, जीवन विम्याबाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान तसेच स्थानिक भागाची माहिती आदी बाबींचा विचार केला जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारास रु. ५ हजारांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून जमा करावी लागेल. ही रक्कम NSC/KVP स्वरूपात ठेवावी लागणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात परवाना देण्यात येईल. त्यानंतर IRDA ची परवाना परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर हा परवाना कायमस्वरूपी परवान्यामध्ये रूपांतरित करण्यात येईल. सदर परीक्षा तीन वर्षांच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. ही नियुक्ती लायसन्स तसेच कमिशन तत्त्वावर राहणार आहे.
इच्छुक पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी कार्यालयीन वेळेत हिंगोली मुख्य डाकघर येथे थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. उमेदवारांनी सोबत बायोडाटा, मूळ कागदपत्रे तसेच आवश्यक प्रमाणपत्रे व अनुभव प्रमाणपत्र असल्यास ते घेऊन येणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी अधीक्षक डाकघर, परभणी विभाग, परभणी-४३१४०१ यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे भारतीय डाक विभागाच्या परभणी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
***
No comments:
Post a Comment