परतीच्या मार्गावर वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त
हिंगोली, दि. ४ (जिमाका) : जिल्ह्यातील विकासकामे तसेच नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक व आरोग्य सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील इमारत बांधकामाची, सेनगाव तालुक्यातील सवना येथील आयुष्मान उपकेंद्राची पाहणी केली. पाहणी दौऱ्यावरून परतताना इंचा गावाजवळ चोरजवळा-पळशी मार्गावर अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर त्यांच्या निदर्शनास आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सदरील ट्रॅक्टर जप्त करून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला.
काम दर्जेदार करा
गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सुरू असलेल्या नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाची पाहणी केली. बांधकामाची सद्यस्थिती, कामाचा दर्जा तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणाऱ्या पायाभूत सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. बांधकामाचे काम दर्जेदार पद्धतीने व नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.
आयुष्मान उपकेंद्राला भेट
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सेनगाव तालुक्यातील सवना येथील आयुष्मान उपकेंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. उपकेंद्रामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा, उपलब्ध औषधसाठा, मनुष्यबळ तसेच दैनंदिन कामकाजाची माहिती त्यांनी संबंधितांकडून घेतली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
एक ट्रॅक्टर जप्त
पाहणी दौरा आटोपून परतत असताना इंचा गावाजवळ चोरजवळा-पळशी मार्गावर जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास विना क्रमांकाचा ट्रॅक्टर अवैधरीत्या वाळूची वाहतूक करताना आला. त्यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार ट्रॅक्टर जप्त करून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून, याप्रकरणी पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment