जिल्हाधिकाऱ्यांची दिली मृदा चाचणी प्रयोगशाळेस भेट
*मृदा आरोग्य पत्रिका वेळेत देण्याच्या सूचना*
हिंगोली, दि. 25 (जिमाका) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हा मृद सर्वेक्षण व मृदा चाचणी अधिकारी, हिंगोली यांच्या अधिनस्त असलेल्या मृदा चाचणी प्रयोगशाळेस भेट देऊन प्रयोगशाळेची पाहणी केली. यावेळी त्यांनी माती नमुने पृथक्करण प्रक्रिया, सूक्ष्म अन्नद्रव्य तपासणीसाठी वापरण्यात येणारी उपकरणे तसेच मृदा तपासणीची कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती घेतली.
शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. जमिनीची गुणवत्ता व उपलब्ध अन्नद्रव्यांच्या स्थितीनुसार पिकांना आवश्यक खतांचा संतुलित वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले. तसेच मृदा आरोग्य पत्रिकेची माहिती Agristack पोर्टलशी संलग्न करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
पिकांची उत्पादकता व जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी मृदा परीक्षणाचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नमूद केले. अधिकाधिक शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेतल्यास जमिनीच्या आरोग्यानुसार खत व्यवस्थापन करणे शक्य होईल, याबाबत जनजागृतीवर भर द्यावा असेही सांगितले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कछवे, कृषी उपसंचालक प्रसाद हजारे, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृदा चाचणी अधिकारी सुनील गोडगे यांच्यासह प्रयोगशाळेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment