हिंगोली, दि. १५ (जिमाका) : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी हिंगोली जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने सकाळी ८.४० वाजता नांदेड रोड, हिंगोली येथील मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतिस्तंभ, स्वातंत्र्यसैनिक अण्णाराव टाकळगव्हाणकर बाल उद्यान येथे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी सीताराम झिरवाळ यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे.
त्यानंतर सकाळी ९.०० वाजता ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment