25 September, 2026

जल जीवन मिशनच्या कामांना गती द्या; जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश



हिंगोली, दि. २५ (जिमाका) : जल जीवन मिशन अंतर्गत प्रलंबित नळ पाणीपुरवठा योजनेची कामे तातडीने पूर्ण करून ग्रामीण भागातील नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा कामांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, भौतिक व आर्थिक प्रगती तसेच कामांमध्ये येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सुरू असलेल्या कामांची प्रगती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेण्यात आली. कामांमध्ये येणाऱ्या अडचणी संबंधित विभागांनी समन्वयाने दूर करून कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

ज्या कामांसाठी सुधारित अंदाजपत्रक आवश्यक आहे, अशा कामांचा सविस्तर आढावा घेऊन सुधारित अंदाजपत्रके तयार करावीत. संबंधित स्तरावर मंजुरी घेण्याची कार्यवाहीही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

 *पूर्ण झालेल्या कामांची कार्यान्वित स्थिती तपासा* 

जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या नळ पाणीपुरवठा कामांची कार्यान्वित स्थिती तपासावी. त्यामध्ये आढळणाऱ्या त्रुटी तातडीने दूर कराव्यात. नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रलंबित कामांचा नियमित आढावा घेऊन त्यांना गती द्यावी. कामांची गुणवत्ता आणि निर्धारित कालमर्यादा याकडे संबंधित यंत्रणांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे सहअध्यक्ष विवेक गायकवाड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, अभियंते उपस्थित होते.

No comments: