24 September, 2026

भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानाचे 27 ते 29 सप्टेंबरदरम्यान आयोजन, पात्र लाभार्थ्यांनी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

 

भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानाचे 27 ते 29 सप्टेंबरदरम्यान आयोजन

पात्र लाभार्थ्यांनी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

        हिंगोली, दि. 24 (जिमाका) : विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक शासकीय प्रमाणपत्रे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत 27 ते 29 सप्टेंबर 2026 या कालावधीत विशेष ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, हिंगोली यांनी केले आहे.

        विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक ओळखपत्रे व शासकीय प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. भटक्या जीवनशैलीमुळे या समाजघटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने हे विशेष अभियान आयोजित करण्यात आले आहे.

        या अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यात तालुकानिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 27 सप्टेंबर रोजी हिंगोली तालुक्यातील कोथळज येथे, दि. 28 सप्टेंबर रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील सुखापूर येथे आणि दि. 29 सप्टेंबर रोजी कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

        या विशेष अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांनी आपल्या गावाजवळ आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचा लाभ घेऊन आवश्यक प्रमाणपत्रांसाठी कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments: