25 September, 2026

पीडित कुटुंबाला जिल्हाधिकाऱ्यांचा धीर, सेवा संकल्प अभियानांतर्गत आखाडा बाळापूर येथे भेट; शासकीय मदत व सुरक्षेबाबत केली विचारपूस



सेवा संकल्प अभियानांतर्गत आखाडा बाळापूर येथे भेट; शासकीय मदत व सुरक्षेबाबत केली विचारपूस
हिंगोली, दि. २५ (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आखाडा बाळापूर येथील ॲट्रॉसिटी प्रकरणातील मयत पंजाबराव मोरे यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या घरी भेट घेऊन विचारपूस केली. कुटुंबीयांना येणाऱ्या अडचणी जाणून घेत जिल्हा प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचा धीर त्यांनी दिला.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पीडित कुटुंबाला मिळणाऱ्या अर्थसहाय्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. तसेच पीडित कुटुंबातील पात्र सदस्याला शासकीय नोकरी देण्याबाबतची कार्यवाही व संबंधित प्रक्रियेची माहिती त्यांनी दिली.

आरोपींकडून कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा धमकी होत असल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी कुटुंबीयांना सांगितले. त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असेही ते म्हणाले.

यावेळी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. मरे,  समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे आदी उपस्थित होते.

No comments: