हिंगोली, दि. २१ : हिंगोली जिल्ह्यात दिपावली सण-२०२६ निमित्त किरकोळ फटाके विक्रीचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना तात्पुरता फटाका विक्री परवाना मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांच्या कार्यालयाकडे दि. २१ सप्टेंबर २०२६ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे.
स्फोटक अधिनियम, २००८ मधील नियम ११३ अन्वये फॉर्म नं. AE-5 मध्ये अर्ज सादर करावा. अर्जासोबत अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे दोन छायाचित्रे तसेच आयकर विभागाकडून व्यवसाय कर भरल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच व्यवसाय कर अधिकाऱ्यांचे नादेय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असून, त्याशिवाय अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. २६ सप्टेंबर २०२६ असून, त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
दिपावलीसाठी तात्पुरते फटाका विक्री परवाने खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून देण्यात येतील.
१. तात्पुरते फटाके ज्वलनशील नसलेल्या शेडमध्ये ठेवण्यात यावेत. तसेच अनधिकृत व्यक्तींना शेडमध्ये प्रवेश करता येणार नाही, यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करणे बंधनकारक राहील.
२. फटाके विक्री व साठवणुकीची दुकाने एकमेकांपासून कमीत कमी १५ मीटर अंतरावर असावीत तसेच सुरक्षित स्थळापासून ५० मीटर अंतरावर असावीत.
३. फटाका विक्रीचे शेड एकमेकांच्या समोर नसावेत.
४. शेडमध्ये कोणत्याही प्रकारचे तेलाचे दिवे, गॅस दिवे अथवा उघडे दिवे वापरू नयेत. विद्युत बल्ब वापरल्यास ते भिंतीवर बसविलेले असावेत. केवळ वायरने लोंबकळत ठेवलेले विद्युत बल्ब वापरू नयेत. विद्युत बल्बचे बटन प्रत्येक दुकानाच्या भिंतीवर बसविलेले असावे. तसेच प्रत्येक रांगेमध्ये मास्टर स्विचची व्यवस्था करणे आवश्यक राहील.
५. फटाका विक्रीच्या शेडपासून ५० मीटरच्या आत कोणत्याही प्रकारचे फटाके फोडू नयेत.
६. एका ठिकाणी ५० पेक्षा अधिक फटाका विक्रीच्या दुकानांना परवानगी देण्यात येणार नाही.
७. व्यवसाय कर अधिकाऱ्यांचे नादेय प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
८. तात्पुरत्या फटाका परवान्याची रु. ६००/- शुल्क चालानद्वारे भरणे आवश्यक राहील.
जिल्ह्यातील दिपावली सणाच्या कालावधीत फटाका विक्री व्यवसाय करू इच्छिणाऱ्या संबंधितांनी विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून तात्पुरता फटाका विक्री परवाना प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, हिंगोली राहुल गुप्ता यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment