16 September, 2026

पीक नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार - पालकमंत्री नरहरी झिरवाळ








शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी केली पीक पाहणी


हिंगोली, दि. 16 (जिमाका) : जिल्ह्यात मागील 20 ते 25 दिवसांपासून पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून, सोयाबीन, कापूस व तूर पिकांवर ओलावा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. पिकांच्या नुकसानीसाठी शासन स्तरावर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.


सेनगाव तालुक्यातील मन्नास पिंपरी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधिक्षक श्रेणीक लोढा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.


सेनगाव तालुक्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सध्या सोयाबीन पीक शेंगा लागणे व दाणे भरणे या उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेत आहे. मात्र, या कालावधीत पावसाचा खंड पडल्याने पिकांमध्ये तीव्र ओलावा ताण निर्माण झाला आहे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ खुंटलेली, पाने फिकट पडलेली, पिके कोमेजलेली तसेच काही ठिकाणी पाने करपण्याच्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले.


पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सेनगाव तालुक्यातील शेषेराव मोतीराम मोरे, शेख जाफर शेख दाउद, शेख मुजीब, शेख वाजीद शेख कौसर आणि सुभाष दत्तराम पारिस्कर या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक परिस्थिती व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.


“शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा. शासन त्यांच्या पाठीशी आहे,” असे सांगत पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. जिल्ह्यातील प्रदीर्घ पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या पीक परिस्थितीचा संपूर्ण अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांना दिल्या.

00000

No comments: