29 September, 2026

हिंगोली जिल्हा रुग्णालयात ‘जागतिक हृदय दिन’ साजरा

हिंगोली जिल्हा रुग्णालयात ‘जागतिक हृदय दिन’ साजरा
निरोगी हृदयासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार व तणावमुक्त जीवनशैलीचा सल्ला

हिंगोली, दि. २९ (जिमाका) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे ‘जागतिक हृदय दिनानिमित्त’ विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आणि ‘स्टेमी’ प्रकल्पांतर्गत आयोजित या कार्यक्रमात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना हृदयाचे आरोग्य जपण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांनी तरुणांमध्येही हृदयविकाराचा धोका वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. बदलती जीवनशैली, मानसिक ताणतणाव आणि अयोग्य आहारपद्धती यामुळे हृदयविकाराचा धोका वाढत आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी निरोगी हृदयासाठी दररोज किमान ३० मिनिटे वेगाने चालणे, योग किंवा हलका व्यायाम करण्याचा सल्ला दिला. आहारातील मीठ, साखर आणि तेलाचे प्रमाण कमी ठेवावे. पालेभाज्या, फळे व तंतुमय पदार्थांचा आहारात समावेश करावा. धूम्रपान व तंबाखूचे सेवन टाळावे. पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनशैलीचा अवलंब करावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी हृदयविकाराची लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन केले. छातीत तीव्र दुखणे, डावा हात किंवा जबडा दुखणे तसेच अचानक मोठ्या प्रमाणात घाम येणे ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात. अशा वेळी विलंब न करता शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. ‘स्टेमी’ प्रकल्पांतर्गत हृदयविकाराच्या रुग्णांसाठी तत्पर उपचार सुविधा उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमादरम्यान रुग्णालय परिसरात हृदयविकाराची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि निरोगी जीवनशैलीबाबत भित्तीपत्रके व माहितीपत्रकांद्वारे जनजागृती करण्यात आली. तसेच उपस्थित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याची सामूहिक शपथ घेतली.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, डॉ. नंदू करवा, प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल पवार, डॉ. नितीन पुरोहित, वैद्यक डॉ. आर. एस. बोथीकर, जिल्हा समन्वयक डॉ. किरण लोंढे, मेट्रॉन श्री. चिंचकर, ‘स्टेमी’ समन्वयक रत्नाकर निळकंठे, दीपक लोखंडे, सचिन रुपुरकर, नितीन पांढरे यांच्यासह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

No comments: