• सामूहिक प्रयत्नातून आरोग्य चळवळ गतिमान व्हावी- मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे प्रतिपादन
हिंगोली, (दि. २४ ): ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्यमान उंचावण्यासाठी आणि तळागाळातील घटकांपर्यंत दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १ एप्रिल २०२६ पासून 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणीसाठी सामूहिक प्रयत्नातून आरोग्य चळवळ गतिमान करावी, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले.
जिल्हा परिषदेतील पंचायत समिती सभागृहामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली "माझं गाव आरोग्य संपन्न गाव" जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे,
प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र) समृध्दी दिवाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गडापोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) विजय बोराटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी बुचाले, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे, उपशिक्षणाधिकारी आसावरी काळे यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व ५६३ ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान एक व्यापक लोकचळवळीच्या रूपात राबवून, स्वत:ला झोकून देत काम करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिल्या.
सामूहिक प्रयत्नातून जिल्ह्यातील एक गाव, राज्यस्तरावर बक्षीस पात्र झाले पाहिजे. गाव निरोगी झाल्यास जिल्हा निरोगी होईल आणि पर्यायाने राज्य निरोगी होईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गायकवाड यांनी संबोधित केले.जिल्ह्याला राज्यस्तरावर आदर्श बनवण्याचा सामूहिक संकल्प यावेळी करण्यात आला. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून "माझं गाव आरोग्य संपन्न गाव" अभियान आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
अभियानाचे मुख्य उद्दिष्ट: ‘प्रजा निरोगी, तर राज्य सशक्त’ : कार्यशाळेदरम्यान अभियानाच्या स्वरूपावर प्रकाश टाकताना स्पष्ट करण्यात आले की, 'प्रजा निरोगी, तर राज्य सशक्त' या मूळ तत्त्वावर हे अभियान आधारलेले आहे. हे केवळ आरोग्याची प्राथमिक तपासणी करण्यापुरते मर्यादित नसून, आरोग्याला थेट ग्रामविकासाच्या केंद्रस्थानी आणणारे एक व्यापक व्यासपीठ आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकातील नागरिकाला त्याच्या घरापासून जवळ, सर्वसमावेशक, मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे या अभियानाचे मुख्य ध्येय आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत अभियानाशी संबंधित सर्व पूर्वतयारी व नियोजित कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी यावेळी दिले.
"ग्रामीण भागात आरोग्याची एक मोठी चळवळ उभी करण्याची गरज आहे. आरोग्य विभागातील अधिकारी, गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायतींचे सरपंच यांनी या अभियानात आघाडीवर राहून उत्स्फूर्तपणे काम केले पाहिजे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून हिंगोली जिल्ह्याला या अभियानांतर्गत राज्यपातळीवर सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध रहावे." : विवेक गायकवाड (भा.प्र.से.)
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी सर्व विभागाने एकत्र येऊन समन्वयाने काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सांगितले.
• गुणांकन व पारितोषिके: प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी ग्रामपंचायतींचे गुणांकन करण्याची पद्धत, मूल्यमापनाचे निकष आणि विजेत्या ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या पारितोषिकांची माहिती उपस्थितांना दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाची रुपरेषा मांडली.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन व तांत्रिक सत्रे
कार्यशाळेत विविध तज्ज्ञांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले:
• वर्तन बदल संवाद : राज्यस्तरीय प्रशिक्षक स्नेहा गवई, प्रीती बगमारे यांनी विविध प्रात्यक्षिके आणि खेळांच्या माध्यमातून नागरिकांमधील आरोग्यविषयक सवयी बदलण्यासाठीचा 'वर्तन बदल संवाद' कसा साधायचा, याचे अत्यंत रंजक आणि प्रभावी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आरोग्याची देवता भगवान धन्वंतरी आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये यांनी केले. तर आभार जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र पुरी यांनी मानले.
यावेळी सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक आणि आशा वर्कर उपस्थित होत्या.
00000
No comments:
Post a Comment