15 September, 2026

आरोग्य सेवा अधिक गुणात्मक व दर्जेदार देण्यास सर्वोच्च प्राधान्य; दयावे – आयुक्त संजय काटकर आश्रम शाळा खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांची ३१ ऑक्टोंबरपर्यंत १०० टक्के आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना; आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीवर विशेष भर








हिंगोली, (दि. १५ सप्टेंबर ) 

परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध योजना, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीचा आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई संजय श्रीपतराव काटकर यांनी आज दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या चेंबरमध्ये सविस्तर आढावा घेतला. 

नागरिकांना गुणात्मक, दर्जेदार, वेळेत आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही आरोग्य विभागाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


आढावा बैठकीत योजनानिहाय व कार्यक्रमनिहाय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आरोग्य योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणेने अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


अंगणवाडीतील बालकांची १०० टक्के आरोग्य तपासणी पूर्ण झाली असल्याचे आर बी एस के समन्वयक यांनी बैठकीत सांगण्यात आले


अंगणवाडी केंद्रांमध्ये येणाऱ्या बालकांच्या आरोग्य तपासणीला विशेष प्राधान्य देण्यात यावा तसेच तपासणीदरम्यान आढळणाऱ्या आरोग्यविषयक समस्या, कुपोषण, जन्मजात दोष, विकासातील अडथळे अथवा इतर आजारांचे वेळेत निदान करून आवश्यक उपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले.


आश्रम शाळा सह खाजगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची ३१ ऑक्टोंबर पर्यंत १०० टक्के आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश


जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीही प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. ३१ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत आश्रम शाळा सह खाजगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची १०० टक्के आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात यावी, यासाठी आरोग्य विभाग व शिक्षण विभागाने समन्वयाने नियोजन करावे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.


तपासणी केवळ औपचारिक न राहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्वसमावेशक तपासणी करून आजारांचे लवकर निदान, उपचार, समुपदेशन आणि आवश्यकतेनुसार उच्चस्तरीय आरोग्य संस्थेकडे संदर्भ सेवा देण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले.


आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची नियमित व सर्वसमावेशक आरोग्य तपासणी


राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमित व सर्वसमावेशक आरोग्य तपासणी करण्यात यावी. दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या वेळेत शोधून त्यावर उपचार करण्यावर भर देण्यात यावा, असे आयुक्तांनी सांगितले.


RBSK वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खासगी वैद्यकीय व्यवसाय तात्काळ बंद करावा


RBSK अंतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासकीय सेवेत असताना खासगी वैद्यकीय व्यवसाय करू नये. खासगी वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे आढळल्यास तो तात्काळ बंद करावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यात आले.


बोगस डॉक्टरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा


परभणी व हिंगोली जिल्ह्यांमध्ये अनधिकृत अथवा बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची नियमित तपासणी व पडताळणी करण्यात यावी. बोगस डॉक्टर आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशा सक्त सूचना आयुक्तांनी दिल्या.


ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारे तडजोड केली जाणार नाही, यासाठी अनधिकृत वैद्यकीय व्यवसायावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


आरोग्य संस्थांमधील अनुपस्थिती गांभीर्याने घेण्याचे निर्देश


प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी नागरिकांना नियमित व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे. कर्तव्याच्या वेळी वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित आढळल्यास संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांचावर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ आयुक्तालयाकडे सादर करावा, असे निर्देश देण्यात आले.


अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियुक्त मुख्यालयी राहून नागरिकांना सेवा द्यावी. कामचुकारपणा, हलगर्जीपणा अथवा कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.


तिशीचा पल्ला’ व ‘तपासणी आणि सल्ला’ अभियान प्रभावीपणे राबवा


नव्याने सुरू करण्यात आलेले ‘तिशीचा पल्ला’ तसेच ‘तपासणी आणि सल्ला’ हे १०० दिवसांचे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या*


या अभियानांतर्गत पात्र नागरिकांपर्यंत पोहोचून आरोग्य तपासणी, आजारांचे लवकर निदान, समुपदेशन आणि आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्यात यावेत. अभियानाची नियमित प्रगती तपासून अपेक्षित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.


असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब, कॅन्सर आणि मधुमेहा या आजारांच्या रुग्णांची स्क्रीनिंग करून पोर्टलवर नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.


क्षेत्रीय स्तरावर संकलित होणारी माहिती संबंधित ऑनलाइन पोर्टलवर नियमित, अचूक व वेळेत नोंदविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.


जिल्हा क्षयरोग केंद्राची पाहणी करून उपचार घेत असलेल्या टीबी रुग्णाची माहिती घेण्यात आली.


हिंगोली जिल्हा रुग्णालयाची पाहणी; रुग्णांशी साधला थेट संवाद


आढावा बैठकीनंतर आयुक्त संजय काटकर यांनी जिल्हा रुग्णालयातील विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये एनआयसी विभाग, अतिदक्षता विभाग (ICU), न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर (NRC) तसेच रुग्णालयातील इतर महत्त्वाच्या विभागांचा समावेश होता.


यावेळी आयुक्तांनी उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या उपचारांची, औषधोपचारांची, उपलब्ध आरोग्य सुविधांची तसेच रुग्णालयीन सेवांची माहिती घेतली. रुग्णांना आवश्यक सेवा वेळेत, सुलभ व समाधानकारक पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.


पुढील अधिकाऱ्यांची उपस्थिती


आढावा बैठकीस उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, परभणी येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, जिल्हा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, डॉ. विशाल पवार, दत्ता डुडुळे, डॉ. बालाजी भाकरे श्रीपाद गारुडी यांच्यासह परभणी व हिंगोली जिल्ह्यातील विविध कार्यक्रम अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.


नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देणे ही सर्वोच्च जबाबदारी


नागरिकांना गुणात्मक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही आरोग्य विभागाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आरोग्य विभागाच्या विविध योजना व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून त्याचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने काम करावे. आरोग्य सेवांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे आयुक्त संजय काटकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

No comments: