11 September, 2026

कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र वितरणासाठी आंबा, येडूत व काकडधाबा येथे शिबिराचे आयोजन

 

हिंगोली जिल्हयातील 13 हजार 707 अर्जदारांना जात प्रमाणपत्र निर्गमित

नागरिकांनी शिबिरांचा लाभ घेण्याचे नोडल अधिकारी विकास माने यांचे आवाहन
हिंगोली, दि. १० (जिमाका) : कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीच्या आढळलेल्या नोंदींची पडताळणी तसेच पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सातत्याने सुरू आहे. आतापर्यत हिंगोली जिल्हयातील 13 हजार 713 अर्जाची पडताळणी करण्यात आली असून, त्यापैकी 13 हजार 707 अर्जदारांना जात प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आली आहेत. केवळ 06 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती वसमतचे उपविभागीय अधिकारी तथा नोडल अधिकारी विकास माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तालुकानिहाय विचार करता, वसमत तालुक्यात या कालावधीत 3 हजार 21 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 3 हजार 20 अर्जदारांना जात प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आली असून, 01 अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. औंढा नागनाथ तालुक्यात प्राप्त झालेल्या 2 हजार 22 अर्जांची पडताळणी करून सर्व 2 हजार 22 अर्जदारांना जात प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आली आहेत. हिंगोली तालुक्यात प्राप्त झालेल्या 2 हजार 908 अर्जांची पडताळणी करून सर्व 2 हजार 908 अर्जदारांना जात प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आली आहेत. सेनगांव तालुक्यात प्राप्त झालेल्या 3 हजार 386 अर्जांची पडताळणी करून 3 हजार 381 अर्जदारांना जात प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आले असून 05 अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. कळमनुरी तालुक्यात प्राप्त झालेल्या 2 हजार 376 अर्जांची पडताळणी करून सर्व 2 हजार 376 अर्जदारांना जात प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आली आहेत.


सर्व महसूल मंडळांच्या ठिकाणी विशेष शिबिरे
उपविभागातील जात प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यवाहीला अधिक गती देऊन पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र वेळेत व सुलभरित्या उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत वसमत उपविभागातील सर्व महसूल मंडळांच्या ठिकाणी कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी मंडळनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी वसमत तालुक्यातील आंबा व औंढा तालुक्यातील येडूत व काकडधाबा येथे या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या विशेष शिबिरांमध्ये संबंधित मंडळ अधिकारी व मंडळस्तरीय कर्मचारी उपस्थित राहणार असून, नागरिकांकडून जात प्रमाणपत्रासाठीचे अर्ज स्वीकारण्यात येतील. अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या आवश्यक कागदपत्रांची छाननी, उपलब्ध नोंदींची पडताळणी तसेच पात्रतेनुसार जात प्रमाणपत्र वितरणाची पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना संबंधित कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता कमी होऊन स्थानिक पातळीवरच ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीच्या नोंदी असलेल्या तसेच जात प्रमाणपत्रासाठी पात्र नागरिकांनी आपल्या संबंधित महसूल मंडळाच्या ठिकाणी आयोजित विशेष शिबिरामध्ये आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून अर्ज सादर करावा आणि या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा नोडल अधिकारी जिल्हा हिंगोली विकास माने यांनी केले आहे.
00000

No comments: