11 September, 2026

सेवा संकल्प अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

 हिंगोली, दि. १० (जिमाका) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपक्रम व्यापक स्वरूपात राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत त्यांनी संबंधित विभागांना अभियानाचे नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. 

अभियानातील प्रत्येक उपक्रम नागरिकाभिमुख, परिणामकारक आणि व्यापक सहभागातून राबविण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर राहणार असल्याचे जिल्हाधिकारी गुप्ता म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयातून या बैठकीस प्रत्यक्ष स्वरूपात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी महेंद्र कांबळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे उपस्थित होते. 

अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी सेवा सेतू अभियान राबविण्यात येणार आहे. तालुकास्तरावर शिबिरे घेऊन विविध सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे. यामध्ये प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, स्वामित्व सनद वाटप, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, वनहक्क दावे, नवीन नळजोडणी, विद्युत जोडणी, दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, आधारकार्ड, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र तसेच ७/१२ व ८-अ नोंदी अद्ययावत करण्यासह विविध सेवा देण्यात येणार आहेत.

‘सेवा माझे योगदान’ उपक्रमांतर्गत गाव व वाड्यांमध्ये स्थानिक गरजेनुसार स्वच्छता, वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य तपासणी, जलस्रोत स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती, रस्ते सुरक्षा, सायबर सुरक्षा, मतदार जागृती, सरकारी योजनांची माहिती आदी उपक्रम राबविण्याचे नियोजन अत्यंत सुक्ष्मपणे करावे. ग्रामीण भागातील उपक्रमांसाठी गट विकास अधिकारी नोडल अधिकारी राहणार आहेत.

तसेच सेवा ज्योत यात्रा, आशीर्वादाचा दिवा, बदलाची गोष्ट, अंगणवाडी उत्सव, नमो सेवा गाथा, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, राष्ट्रीय इनोव्हेशन चॅलेंज आणि जनसेवक महाकुंभ यांसारखे उपक्रमही अभियानाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहेत. शासनाच्या योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात झालेला सकारात्मक बदल यशोगाथांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत. यानुसार सर्व विभागांनी कामांचे व्हिडीओ चित्रीकरण, रिल्स व फोटो यांचे संकलन करावे. या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येकाने समन्वय ठेऊन कार्य करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

*****

No comments: