12 September, 2026

भरती परीक्षा सुधारणांसाठी हिंगोलीत विशेष कक्ष

⏺️ १८ सप्टेंबरपर्यंत सूचना, अभिप्राय सादर करण्याचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे आवाहन

 ⏺️ छत्रपती संभाजीनगरात २१ सप्टेंबरला उच्चस्तरीय टास्क फोर्सचा संवाद

हिंगोली, दि. १२ (जिमाका) : राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्सकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात येत आहेत. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिक, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक आणि लोकप्रतिनिधींनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या सूचना व अभिप्राय सादर करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सहाही महसुली विभागांना भेट देत आहे. यावेळी विद्यार्थी, उमेदवार आणि संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जात आहेत.

 *हिंगोलीत १८ सप्टेंबरपर्यंत विशेष कक्ष* 

हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना निवासी उपजिल्हाधिकारी (नोडल अधिकारी), जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथील विशेष कक्षात सूचना, हरकती व निवेदने प्रत्यक्ष सादर करता येतील. हा कक्ष १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत राहील. प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या नागरिकांनी आपले लेखी अभिप्राय csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठवावेत.

 *छत्रपती संभाजीनगरात २१ सप्टेंबरला संवाद* 

छत्रपती संभाजीनगर विभागातील विद्यार्थी, उमेदवार व संबंधित हितधारकांशी उच्चस्तरीय टास्क फोर्स २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे संवाद साधणार आहे.

 *या बाबींवर अभिप्राय अपेक्षित* 

विद्यमान परीक्षा प्रणाली, प्रश्नपत्रिका तयार करणे व वितरण, परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, मूल्यमापन व निकाल प्रक्रिया, डिजिटल प्रणाली व बायोमेट्रिक प्रमाणीकरण, सीसीटीव्ही देखरेख, ऑडिट ट्रेल्स, पेपरफुटी व अन्य गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा केंद्रांची किमान मानके, विविध यंत्रणांमधील समन्वय तसेच उमेदवारांसाठी तक्रार निवारण प्रणाली याबाबत सूचना व अभिप्राय अपेक्षित आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त सर्व सूचना व अभिप्रायांचे संकलन करून ते उच्चस्तरीय टास्क फोर्सकडे सादर करण्यात येणार आहेत. या सूचनांचा अभ्यास करून भरती परीक्षा प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्याबाबत शासनास शिफारशी करण्यात येणार आहेत.

No comments: